आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सामनानिश्चिती प्रकरणात अडकलेला राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटपटू अजित चंडेला आणि मुंबईचा क्रिकेटपटू हिकेन शाह यांच्या भवितव्याचा निर्णय या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) शिस्तपालन समितीची बैठक २४ डिसेंबरला होणार असून यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नेतृत्वाखाली शिस्तपालन समितीची बैठक होणार आहे. शिस्तपालन समितीला या दोघांवर आजीवन बंदी घालण्याचेही अधिकार आहेत.

आयपीएल स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी चंडेलाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. चंडेलाबरोबर अटक करण्यात आलेले त्याचे राजस्थान रॉयल्सचे सहकारी एस. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्यावर यापूर्वीच आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरण उजेडात आले आणि त्यानंतर चंडेलाला आयपीएलमध्ये एकही सामना खेळता आलेला नाही. बीसीसीआयच्या लाचलुचपतविरोधी नियमांचा भंग केल्याचा आरोप हिकेनवर ठेवण्यात आला आहे