संपूर्ण भारताला अभिमान वाटावा अशा ‘चांद्रयान २’चे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन सोमवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती आहे. हे यान अवकाशात झेपावणे हा फारच अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण होता, त्यामुळे ते झेपावल्यानंतर अनेकांनी ट्विटरवरुन आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बरोबरच अनेक दिग्गज नेत्यांनी, अभिनेत्यांनी, खेळाडूंनी आणि कलाकारांनी इस्रोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. जनसामान्यांनीही सोशल मीडियावरून या प्रक्षेपणाबद्दल आनंद व्यक्त केला. यात फिरकीपटू हरभजन सिंग याने केलेले ट्विट विशेष चर्चेचा विषय ठरला.

सोशल मीडियावर बराच व्हायरल झालेला मेसेज हरभजनने आपल्या ट्विटवर पोस्ट केला. त्यात “काही देशांच्या ध्वजावर चंद्र आहे, तर काही देशांचे ध्वज चंद्रावर आहेत”, असे लिहिले होते आणि त्यात पाकिस्तानचा झेंडा ईमोजी म्हणून वापरला.

त्याच्या या ट्विटवर अनेक नेटिझन्सनी खुमासदार प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्याच ट्विटचा आधार घेत पाकची खिल्ली उडवली. याशिवाय, इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतानाच भारतीयांनी शेजारी असणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली. भारत चंद्राकडे झेपावला तरी पाकिस्तान अजून आमच्या सीमा ओलांडण्यात व्यस्त आहे, असा टोला काही नेटकऱ्यांनी लगावला. काहींनी भारताने यान चंद्राकडे पाठवलं असून पाकिस्तानने पंतप्रधान अमेरिकेकडे पाठवला आहे, असा चिमटा काढला.