News Flash

वरळीच्या किल्ल्याचा शरीरसंवर्धनाचा बुरूज!

किल्ल्यात मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू या भाषांमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत असते.

- डेनिस पाटील, वरळी किल्ला व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक

सोलापूर : वरळी कोळीवाडय़ातील किल्ला म्हणजे मुंबईची शान. मुंबईतील अनेक किल्ल्यांची पडझड झाली असतानाही अनेक वादळे-संकटे झेलत मोठय़ा दिमाखदारपणे उभा असलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे हा किल्ला. समोर उभ्या असलेल्या उंचउंच इमारती आणि आता वांद्रे-वरळी सागरी सेतूमुळे वरळी किल्ल्याच्या सौंदर्यात वाढच झाली आहे. सद्य:स्थितीत किल्ले म्हणजे मद्यपी, जुगारी, भिकारी आणि वाईट धंदे करणाऱ्यांचे अड्डेच बनले आहेत. पण वरळीतील किल्ला त्यास अपवाद ठरत आहे. कारण त्याला कारणीभूत ठरली आहे ते अनेक अडीअडचणींवर मात करून मोठय़ा महत्प्रयासांनी उभे राहिलेले वरळी किल्ला व्यायाम मंदिर.

पूर्वी वरळी किल्ला म्हणजे वरळी कोळीवाडय़ातील कोळी लोकांसाठी मासळी सुकवण्यासाठीचे तसेच मद्यपी, जुगारी लोकांसाठीचे सुरक्षित ठिकाण होते. अगदी ८०-९०च्या दशकातही हेच चित्र तिथे पाहायला मिळत होते. गावातील दर्यावर्दी क्रीडा मंडळाचा कबड्डीचा संघ स्थानिक स्पर्धामध्ये चमकत होता. गावात दोन आखाडे असले तरी व्यायामशाळेची कमतरता जाणवत होती. त्यामुळेच एका सदस्याच्या घरी व्यायाम केला जायचा. पण त्याच सदस्याच्या घरी लग्नकार्य आल्यामुळे जिमचे सामान किल्ल्यातील एका छोटय़ाशा खोलीत आणण्यात आले. तेव्हापासूनच वरळी किल्ला व्यायाम मंदिराला सुरुवात झाली. एका बाजूला व्यायाम सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मद्यपी, जुगारूंची टोळी येऊन त्यांना त्रास द्यायची. ही जागा पुरातत्व खात्याची असल्यामुळे त्यांचेही लक्ष वरळी किल्ल्याकडे नव्हते. हे चित्र कुठेतरी बदलायचे, हा चंग डेनिस पाटील ऊर्फ डॅनी यांनी मनाशी बांधला.

एक ज्युदो खेळाडू म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या डेनिस यांनी जुगार खेळणाऱ्यांना, दारू पिणाऱ्यांना मज्जाव करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी त्यांना आडकाठीही आणण्याचा प्रयत्न झाला. पण मी आपल्या प्रयत्नांवर ठाम असलेले डेनिस हे मागे हटले नाहीत. ज्युदो खेळाडू आणि निष्णात व्यायाम प्रशिक्षक असलेल्या डेनिस यांनी ३० वर्षांपूर्वी व्यायामशाळेत सुधारणा करण्याचेही ठरवले. व्यायामशाळेत येणारी मंडळी सधन कुटुंबातील नसल्यामुळे लोकवर्गणीतून अद्ययावत साधनसामुग्री आणण्यात आली.

काही महिन्यांनी सकारात्मक चित्र दिसू लागले. जुगारी आणि मद्यपींची वर्दळ कमी झाली. व्यायामशाळेत येणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. समोर वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि उंचउंच इमारती असे नयमरम्य दृश्य आाणि हवेशीर जागा असल्यामुळे गावातील विद्यार्थी सकाळ-संध्याकाळच्या वेळी वरळी किल्ल्यात अभ्यासासाठी येऊ लागली. त्यामुळे डेनिस पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हुरूप वाढत गेला. त्यानंतर शोभिवंत झाडे आणि दररोज साफसफाई करून वरळी किल्ल्याचे संवर्धन करण्याचे आम्ही ठरवले, असे डेनिस सांगतात.

सद्य:स्थितीला वरळी कोळीवाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील १००हून अधिक मुले दररोज या व्यायामशाळेत सराव करत आहेत. त्यातील अनेक शरीरसौष्ठवपटू राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवत आहेत. अनेकांनी मुंबई-श्री, महाराष्ट्र-श्री आणि भारत-श्री या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. व्यायामशाळेतील संजय पडवळ, संकेत भरमकर, समीर वरळीकर, सुनील पाटील, विनायक वरळीकर, यांसारख्या अनेक खेळाडूंनी शरीरसौष्ठव स्पर्धामध्ये छाप पाडली आहे. विशेष म्हणजे, या व्यायामशाळेतील काही मुले ही मुंबई पोलीस, सैन्यदलात जाऊन देशाची सेवा करत आहेत. सकाळ-संध्याकाळ येथे योगा वर्गही नि:शुल्क चालवले जात आहेत. योगा अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यायामशाळेतील मुलेच लहान मुलांसह वयस्कर मंडळींना योगाचे धडे देत आहेत. अत्याधुनिक साधनसामुग्री आणणे तसेच वीजबिल आणि अन्य दुरुस्ती-देखभालीची कामेही व्यायामशाळेत येणाऱ्या मंडळींमध्येच वर्गणी काढून भागवली जातात.

किल्ल्यात मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू या भाषांमधील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. पण ही मंडळी चित्रीकरण संपल्यानंतर खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या आणि अन्य कचरा टाकून तशीच निघून जातात. त्याचा फटका सकाळी व्यायामशाळेत येणाऱ्या मुलांना व्हायचा. यामुळे चित्रपटाच्या चमूबरोबर अनेकदा वादही झाले. आता रीतसर परवानगी घेतल्यानंतरच किल्ल्यात चित्रीकरण होत आहे. त्याचबरोबर मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, समुद्रामार्गेच दहशतवाद्यांनी मुंबईत शिरकाव केला होता. तसेच किल्ल्याच्या अगदी समोरून जाणारा वांद्रे-वरळी सी लिंक उडवण्याची धमकीही अनेकदा दिली जाते. त्यामुळे समुद्राच्या टोकाला असलेल्या या किल्ल्यातील व्यायामशाळेत शरीरसौष्ठवपटूंचा राबता असल्यामुळे येथे येणाऱ्या अनोळखी आणि संशयास्पद व्यक्तींची विचारपूस केली जाते. व्यायामशाळेतील अनेक जण सागरी सुरक्षारक्षक म्हणूनही काम पाहत आहेत. सामाजिक बांधिलकी जपणारे हे वरळी किल्ला व्यायाम मंदिर इतरांसाठी प्रेरणादायीच आहे.

सध्याची पिढी मोबाइलच्या आहारी गेली असताना त्यांना व्यायामाचे तसेच तंदुरुस्तीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. आता वरळी किल्ल्यातील व्यायामशाळा हेच माझे ध्येय बनले आहे. ३० वर्षांपासून आम्ही येथे फारच सकारात्मकतेने काम करत आहोत. त्या काळात आम्हाला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. पुरातत्व खात्यानेही व्यायामशाळेवर आक्षेप घेतला होता. पण त्यांना आमच्या चांगल्या उपक्रमाविषयीची माहिती समजावून सांगण्यात आली. त्याचबरोबर आम्ही केव्हाही ही व्यायामशाळा येथून हटवण्यास तयार आहोत, हे सांगितल्यानंतर त्यांनीही आमच्या या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

– डेनिस पाटील, वरळी किल्ला व्यायाम मंदिराचे प्रशिक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 2:14 am

Web Title: chang denis patil trainer in worli fort gym
Next Stories
1 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा बडोद्यावर विजय
2 मुंबईची सौराष्ट्रवर आठ धावांनी मात
3 माकरान चषक बॉक्सिंग स्पर्धा : भारताला एक सुवर्ण, पाच रौप्य पदके
Just Now!
X