लोक टीका करतात, म्हणून त्यांच्यासाठी मी फलंदाजीत परिवर्तन का करावे, असा सवाल भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने केला आहे.

२०११मध्ये भारतीय संघ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा साहा संघाचा राखीव यष्टीरक्षक होता.  २०१४मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला, त्यावेळी बॅट्स, टॉवेल आणि पाणी हेच कार्य त्याला करावे लागले. आता २०२१मध्ये ऋषभ पंत भारताचे यष्टीरक्षण करणार असून, साहाच्या वाटय़ाला दशकानंतरही तीच स्थिती अनुभवावी लागणार आहे.

‘‘तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही, तेव्हा टीका होणे स्वाभाविक आहे. परंतु टीकाकारांसाठी फलंदाजीत बदल करणे मला पटत नाही. मी गेली काही वष्रे घेतलेल्या धडय़ांआधारे कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो,’’ असे साहाने सांगितले.

धोनीच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर साहाने यष्टीरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, परंतु दुखापतीमुळे त्याचे संपूर्ण २०१८ हे वर्ष वाया गेले. या कालखंडात पंतने उपयुक्तता सिद्ध केली.

‘‘दुखापतीमुळे मी क्रिकेटपासून दूर असताना पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक आणि पंतला संधी मिळाली. यापैकी पंतने संधीचे सोने केले आणि संघातील स्थान निश्चित केले. कदाचित मी आणखी काही सामने खेळू शकलो असतो,’’ असे साहाने सांगितले.