जागतिक क्रिकेट परिवर्तनाच्या वाटेवरून जात असल्याचे २०१५च्या कसोटी क्रिकेटचा आढावा घेतल्यास सहजपणे अधोरेखित होते. ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल कसोटी संघातून अनेक दिग्गजांनी निवृत्ती पत्करली. त्यांच्या नेतृत्वाची धुरा मायकेल क्लार्ककडून स्टीव्ह स्मिथच्या समर्थ खांद्यांवर सोपवण्यात आली. त्याने आयसीसीचे वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू (गॅरी सोबर्स पुरस्कार) आणि कसोटीपटू असे दोन पुरस्कार पटकावून तसेच संघाचा रुबाब राखून आपली छाप पाडली. मागील वर्षीच्या अखेरीस महेंद्रसिंग धोनीने तडकाफडकी निवृत्ती पत्करल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या वर्षी भारताने श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला. याशिवाय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात पहिलावहिला प्रकाशझोतातील कसोटी सामना झाल्याने एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आहे.

मागील वर्षी झालेल्या ४३ कसोटी सामन्यांत (दोन चालू आहेत) ३२ निकाली ठरले आणि ९ सामने अनिर्णीत राहिले. त्यामुळे अनुकूल वातावरण, खेळपट्टय़ा यांचा फायदा उचलत कसोटी जिंकण्याचे सूत्र बऱ्याच संघांसाठी यशस्वी ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर आहे, तर भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया एका गुणाच्या फरकाने तिसऱ्या स्थानावर आहे.

विराटयुगाला प्रारंभ

धोनीकडून कर्णधारपदाची जबाबदारी विराट कोहलीकडे सोपवण्यात आली. मग श्रीलंका दौऱ्यावरील पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत २-१ असा विजयाचा करिश्मा कोहलीने दाखवला. श्रीलंकेचा संघ २२ वर्षांनी प्रथमच मायदेशात अशा पद्धतीने हरला. मग या युवा कर्णधाराने जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी धूळ चारण्याची किमया साधली. आफ्रिकेचा संघ नऊ वर्षांनी पहिल्यांदा परदेशात मालिका गमावून बसला. मात्र भारत-आफ्रिका मालिकेतील मोहाली आणि नागपूरचे दोन कसोटी सामने तीन दिवसांत निकाली ठरल्यामुळे भारताच्या विजयापेक्षा खेळपट्टीचीच अधिक चर्चा झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), संघ व्यवस्थापन आणि कर्णधार कोहली यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांची आग्रही मागणी धरली. परंतु आयसीसीने जामठाच्या खेळपट्टीवर ‘खराब’ असा शेरा मारत अधिकृतपणे ताकीद दिली. दिल्लीच्या अखेरच्या कसोटी सामन्याला राज्य सरकारने आडकाठी आणली होती. मात्र उच्च न्यायालयाने न्या. मुकुल मुदगल यांच्या देखरेखीखाली हा कसोटी सामना खेळवला.

याव्यतिरिक्त बांगलादेशविरुद्धचा एकमेव कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. त्याशिवाय धोनी-कोहली वादाची खमंग चर्चा वर्षांच्या मध्यावर रंगली. कसोटी क्रिकेटमध्ये २०१५मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीने (६४०) काढल्या, तर पाचशेहून अधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयचा समावेश आहे. या वर्षांत जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक ६२ बळी घेण्याचा पराक्रम रविचंद्रन अश्विनने केला आहे. त्याला रवींद्र जडेजाने अप्रतिम साथ दिली. ए बी डी’व्हिलियर्स आणि हशिम अमलासारख्या दिग्गज फलंदाजांनाही या फिरकीने जेरबंद केले.

दिग्गज कसोटीपटू निवृत्त

कसोटी क्रिकेटचा दर्जा राखणारे अनेक क्रिकेटपटू यंदाच्या वर्षांत निवृत्त झाले. मायकेल क्लार्क, मिचेल जॉन्सन, ब्रॅड हॅडिन, शेन वॉटसन, ख्रिस रॉजर्स, रायन हॅरिस अशा ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक खेळाडूंनी निवृत्ती पत्करली. याशिवाय शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान), कुमार संगकारा, महेला जयवर्धने (दोघे श्रीलंका), झहीर खान, वीरेंद्र सेहवाग, रमेश पोवार (तिघे भारत), ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे), डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. तर न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमने पुढील वर्षीच्या प्रारंभी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली.

अ‍ॅशेस इंग्लंडकडे

नॉटिंगहॅमला चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने एक डाव आणि ७८ धावांनी ऑस्ट्रेलियावर नेत्रदीपक विजय मिळवला आणि अ‍ॅशेस पुन्हा मिळवला. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने ५-० अशा फरकाने इंग्लंडचा मानहानीकारक पराभव केला होता. पाच कसोटी सामन्याची यंदाची अ‍ॅशेस मालिका इंग्लंडने ३-२ अशी जिंकली. घरच्या मैदानावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग चौथ्या कसोटी मालिकेत विजय मिळवला.

रात्रीस खेळ चाले..

क्रिकेटच्या १३८ वर्षांच्या इतिहासात ‘रात्रीस खेळ चाले..’ हा नवा प्रयोग अस्तित्वात आला. अ‍ॅडलेड ओव्हल येथे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात गुलाबी चेंडूसह प्रथमच दिवस-रात्र स्वरूपाचा कसोटी सामना खेळवण्यात आला. क्रिकेटरसिकांचा मोठा प्रतिसाद लाभलेला हा सामना ऑस्ट्रेलियाने सात विकेट्स राखून जिंकला. हा प्रयोग यापुढेसुद्धा चालू राहील, अशी ग्वाही आयसीसीने दिली.

prashant.keni@expressindia.com