ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघातून वगळल्यानंतर माझ्या फलंदाजीच्या तंत्राबाबत चिंतेत होतो. त्यानंतर तंत्रात केलेल्या बदलानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करू शकलो, असे दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने सांगितले.

गतवर्षी डिसेंबरमध्ये अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटीमधील दोन्ही डावांत २१ वर्षीय पृथ्वी अपयशी ठरला होता. परंतु विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मात्र त्याने आठ सामन्यांत ८२७ धावा करून छाप पाडली. ‘‘ऑस्ट्रेलियातील अपयशानंतर मी आत्मपरीक्षण केले. या चुका मला कमी करायच्या होत्या. मग मी त्या दृष्टीनेच प्रयत्न केले. प्रशिक्षक प्रशांत शेट्टी आणि प्रवीण अमरे यांनी तंत्रातील बदलांबाबत योग्य मार्गदर्शन केले,’’ असे पृथ्वीने सांगितले.

‘‘मला ‘आयपीएल’ ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारासाठी पुरेशा सरावाची संधी मिळाली नाही. परंतु रिकी पाँटिंग, अमरे आणि शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माझा पुरेसा सराव झाला,’’ असे पृथ्वीने सांगितले.