इंडियन प्रिमियर लीगचे (आयपीएल) सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येत असतील तर त्यासाठी लागणाऱ्या पाण्यावर प्रतिलीटर १ हजार रूपये इतका दर आकारण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आयपीएलचे सामने खेळवण्यात येऊ नयेत, असा मतप्रवाह पुढे येताना दिसत होता. मात्र, महाराष्ट्रातील सामन्यांवर ठाम असल्याची प्रतिक्रिया आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली आहे. बीसीसीआय दुष्काळग्रस्तांना सर्वेतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
तहानलेल्या लातूरकरांसाठी रेल्वेने कृष्णेचे पाणी, एकनाथ खडसे यांचे आदेश 
या पार्श्वभूमीवर आयोजकांकडून पाण्यासाठी प्रतिलीटर १ हजार रूपये इतका दर आकारून त्या पैशातून दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवावे अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील, पुण्यातील सहारा स्टेडियमवर आणि नागपुरात सामने खेळवले जाणार आहेत. एका सामन्यात जवळपास २२ लाख लीटर पाणी वापरण्यात येते असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये महाराष्ट्रात तीन ठिकाणी मिळून जवळपास ६५ लाख लीटर पाणी वापरण्यात आले होते, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.