भारतामधील प्रत्येक शाळेत बुद्धिबळ हा खेळ खेळला जावा हे माझे स्वप्न आहे, असे माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने एका पुस्तकासाठी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. आनंदला येथे नुकत्याच झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
या खेळात रशियाच्या मक्तेदारीबाबत आनंदने लिहिले आहे, की रशियात प्रत्येक विवाहसमारंभात नवीन वधूवरांना बुद्धिबळाचा संच भेट दिला जातो. त्यांची मुलामुलींनी हा खेळ खेळावा असाच संदेश ते या भेटीद्वारे देत असतात. बुद्धिबळ हा खेळ रशियन लोकांच्या रक्तातच भिनला आहे. प्रत्येक मुला-मुलीने हा खेळ आत्मसात करण्यासाठी तेथील संघटकांचे प्रयत्न असतात. भारतातही असे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. हा खेळ खेळल्यानंतर कोणाचेही नुकसान होणार नाही उलट विविध प्रकारे फायदाच होणार आहे. एखाद्याने त्यामध्ये कारकीर्द केली नाही, तरी जीवनात या खेळाचा त्याला भरपूर फायदा होतो.
रशियातील लोकांमध्ये उपजतच हा खेळ असतो. मॉस्को येथे १९८० मध्ये मी पहिल्यांदा गेलो, तेव्हा तेथील टॅक्सीचालकाकडेही बुद्धिबळाचा संच पाहून मला कमालीचे आश्चर्य वाटले होते. मात्र जेव्हा अधिकाधिक ठिकाणी हिंडल्यानंतर रशियात या खेळाची किती अफाट लोकप्रियता आहे हे मला लक्षात आले असेही आनंदने म्हटले आहे.
आनंदने पुढे म्हटले आहे, की आता चीन, नॉर्वे, अर्मेनिया, इस्रायल आदी देशांचेही खेळाडू या खेळात जागतिक स्तरावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. जेव्हा मी या खेळात कारकीर्द सुरू केली, तेव्हा आपल्या देशात या खेळाबाबत फारसा उत्साह नव्हता. आता मात्र या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. ही भारतीयांसाठी आशादायक गोष्ट आहे.