इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठीची शर्यत आता रंगतदार स्थितीत येऊन पोहोचली आहे. चेल्सीवर विजय मिळवून मँचेस्टर सिटीला अव्वल स्थानी झेप घेण्याची सुवर्णसंधी होती, मात्र घरच्या मैदानावर या मोसमात पहिल्यांदाच गोल करण्यात अपयश आल्यामुळे मँचेस्टर सिटीला चेल्सीकडून ०-१ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. मँचेस्टर सिटी आणि चेल्सीचे २४ सामन्यांत प्रत्येकी ५३ गुण झाले असले तरी सिटीने गोलफरकाच्या आधारावर दुसरे स्थान प्राप्त केले आहे. अर्सेनल ५५ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे. चौथ्या क्रमांकावरील लिव्हरपूल सात गुणांनी मागे असल्यामुळे आता अर्सेनल, चेल्सी आणि मँचेस्टर सिटी यांच्यातच जेतेपदासाठी शर्यत रंगणार आहे.
प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांचे अफलातून डावपेच आणि ब्रानिस्लाव्ह इव्हानोव्हिक याने पहिल्या सत्रात झळकावलेल्या गोलमुळे चेल्सीला सिटीविरुद्ध विजयाची नोंद करता आली. चेल्सीच्या रामिरेसचा प्रयत्न सिटीच्या विन्सेन्ट कोम्पानी याने हाणून पाडल्यानंतर ३२व्या मिनिटाला इव्हानोव्हिकने डाव्या पायाने मारलेला जोरदार फटका थेट गोलजाळ्यात विसावला. सिटीला बरोबरी साधण्याची संधी होती, पण चेल्सीने आक्रमकतेबरोबरच बचाव खेळाचे सुरेख प्रदर्शन करत मँचेस्टर सिटीचे प्रयत्न तीन वेळा धुडकावून लावले.
‘‘खेळात विविधता आणत आम्ही गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. आम्ही आमचे कच्चे दुवे आणि बलस्थाने यांवर गेल्या काही दिवसांपासून अफाट मेहनत घेत आहोत. प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांच्या सुरेख मार्गदर्शनामुळे आम्हाला विजय साकारता आला. आता घरच्या मैदानावर आमचे बरेच सामने होणार असून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याची संधी मिळणार आहे,’’ असे चेल्सीचा कर्णधार जॉन टेरीने सांगितले.