आर्सेनल, न्यू कॅसलचा पराभव
कुर्ट झोउमा आणि इडन हझार्ड यांनी गतविजेत्या चेल्सीला आर्सेनलवर २-० असा विजय मिळवून दिला. गॅब्रिएल आणि सँटी काझोर्ला यांना लाल कार्ड दाखविल्याने आर्सेनलला ९ जणांसह संघर्ष करावा लागला. वॅटफोर्डनेही २-१ अशा फरकाने न्यूकॅसल युनायटेडचा, तर वेस्ट ब्रॉमविच अ‍ॅल्बिनोनेही दमदार खेळ करताना अ‍ॅस्टन व्हिलाचा १-० असा पराभव केला.
चेल्सी आणि आर्सेनल यांच्यातील लढत पहिल्या सत्रात अटीतटीची झाली. दोन्ही संघांकडून गोल करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु दोघांनाही अपयश आल्याने सामन्यातील वातावरण तापू लागले होते. त्याचा पहिला फटका आर्सेनलला बसला. पहिले सत्र संपायला अवघ्या काही सेकंदांची वेळ शिल्लक असताना आर्सेनलचा बचावपटू गॅब्रिएलने चेल्सीच्या डिएगो कोस्टाला लाथ मारली आणि सामनाधिकाऱ्यांनी त्याला थेट मैदानाबाहेर केले.
दुसऱ्या सत्रात ५३ व्या मिनिटाला कुर्ट झोउमाने हेडरद्वारे गोल करून चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दहा खेळाडूंसह उतरलेल्या आर्सेनलच्या कमकुवत झालेल्या बचावाचा चेल्सीने पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. खेळाडूंची अदलाबदल करून त्यांनी सामन्यात पुनरागमन करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. पहिल्या सत्रात ३१ व्या मिनिटाला पिवळे कार्ड दाखवून ताकीद देण्यात आलेल्या सँटी काझोर्ला याला ७९ व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड मिळाल्याने सामन्याबाहेर जावे लागले. सामनाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर आर्सेनलच्या खेळाडूंनी आक्षेप घेतला, परंतु त्याचा फार उपयोग झाला नाही. निर्धारित वेळेनंतर पहिल्याच मिनिटाला हझार्डने गोल करून चेल्सीच्या विजयावर २-० असे शिक्कामोर्तब केले.
इतर निकाल
वॅटफोर्ड २ (ऑडीऑन इघालो १० व २८ मि.) विजयी वि. न्यू कॅसल युनायटेड १ (डॅरील जॅनमॅट ६२ मि.)
वेस्ट ब्रॉमविच अ‍ॅल्बिनो १ (सैडो बेराहिनो ३९ मि.) विजयी वि. अ‍ॅस्टन व्हिला
मँचेस्टर सिटी १ (केव्हिन डे ब्रुयने ४५ मि.) पराभूत वि. वेस्ट हॅम युनायटेड २ (विक्टर मोसेस ६ मि. व डीआफ्रा सॅखो ३१ मि.)