डेव्हिड लुइझ ठरला विजयाचा शिल्पकार
युरोपा लीग फुटबॉल स्पर्धा
डेव्हिड लुइझने अतिरिक्त वेळामध्ये केलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने एफ.सी. बसेल संघाचा अटीतटीच्या लढतीत २-१ असा पराभव केला. बसेलचा संघ युरोपा लीगमध्ये पहिल्यांच उपांत्य फेरीत दाखल झाला होता, पण यजमानांना मात्र या संधीचे सोने करता आले नाही.
चेल्सीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. बसेलवर जोरदार आक्रमण लगावत चेल्साने १२व्या मिनिटाला पहिला गोल लगावत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली आणि मध्यंतरापर्यंत टिकवलीही. जांघेतील स्नायू दुखावल्यामुळे स्पर्धेपासून तीन महिने दूर राहिलेल्या अ‍ॅश्ले कोलला मध्यंतरानंतर पंचांनी पिवळे कार्ड दाखवले आणि त्यानंतर त्याला न खेळवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. आघाडी मिळाल्यावर चेल्सीचा संघ थोडासा संयमी झाला होता. पण दुसरीकडे बसेलचा संघ बरोबरी करण्यासाठी जिवाचे रान करीत होता, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. अखेर ८७व्या मिनिटाला फॅबियन सहरने पेनल्टीवर गोल लगावत संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. गोल केल्यावर अधिक आक्रमक झालेल्या फॅबियनला गोल केल्यानंतर दोन मिनिटांत पंचांनी पिवळे कार्ड दिले.
सामन्याची ९० मिनिटे पूर्ण झाल्या अतिरिक्त चार मिनिटांच्या खेळात बसेलचा संघ बरोबरी टिकविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत होता, तर चेल्सीचा संघ गोल करण्यासाठी आतुर होता. डेव्हिडने २५ यार्डावरून मिळालेल्या ‘फ्री-किक’चा पुरेपूर फायदा उचलीत गोल केला आणि संघाचा अखेरच्या क्षणी विजय मिळवून दिला.