दिएगो कोस्टाच्या दोन गोलमुळे चेल्सीने एव्हरटनचा ६-३ असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या विजयासह अव्वल स्थान पटकावले आहे. अॅटलेटिको माद्रिदकडून कोस्टाला चेल्सीने विकत घेतल्यानंतर त्याने आतापर्यंत चार गोल लगावत चेल्सीच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. कोस्टासह (पहिल्या व ९०व्या मिनिटाला), ब्रानिस्लाव्ह इवानोव्हिक (तिसऱ्या मिनिटाला), सीमस कोलमन (स्वयंगोल, ६७व्या मिनिटाला), नेमांजा मॅटिक (७४व्या मिनिटाला) आणि रामिरेस (७७व्या मिनिटाला) यांनी चेल्सीकडून गोल केले.
दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यात लिव्हरपूलने टॉटनहॅम हॉट्सपरचे आव्हान ३-० असे सहज मोडीत काढले. रहीम स्टर्लिगने आठव्या मिनिटाला लिव्हरपूलसाठी पहिला गोल केल्यानंतर दुसऱ्या सत्रात दोन गोल करून चेल्सीने विजयावर मोहोर उमटवली. स्टीव्हन गेरार्डने ४९व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. त्यानंतर अल्बेटरे मोरेनो याने ६०व्या मिनिटाला गोल करून चेल्सीला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात, अॅस्टन व्हिलाने हल सिटीचा २-१ असा पाडाव केला. अॅस्टन व्हिलाकडून गॅब्रियल अग्बोनलेहर (१४व्या मिनिटाला) आणि आंद्रेस वेइमॅन (३६व्या मिनिटाला) यांनी गोल केले. हल सिटीकडून निकिका जेलाव्हिक (७४व्या मिनिटाला) याने गोल केला होता.