लिओनेल मेस्सी आणि नेयमार या आक्रमणपटूंच्या अनुपस्थितीत आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पध्रेत उतरलेल्या बार्सिलोना संघाला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. बुधवारी झालेल्या लढतीत इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) विजेत्या चेल्सीने पेनल्टी शूटआऊटमध्ये बार्सिलोनावर ४-२ असा दणदणीत विजय साजरा केला. निर्धारित वेळेत सामना २-२ अशा बरोबरीत सुटल्यानंतर पेनल्टी शुटआऊटचा निर्णय घेण्यात आला. गोलरक्षक थिबाऊट कोर्टोईस याने बार्सिलोनाचे दोन प्रयत्न हाणून पाडल्याने चेल्सीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
मँचेस्टर युनायटेडकडून पराभूत झाल्यानंतर येथे दाखल झालेल्या बार्सिलोनाने दिग्गजांच्या अनुपस्थितही चेल्सीला कडवी झुंज दिली. १०व्या मिनिटाला एडन हजार्डने गोल करून चेल्सीला १-०अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, लुइस सुआरेज आणि सँड्रो रॅमिरेज यांनी मध्यंतरानंतर जबरदस्त खेळ करून अनुक्रमे ५२ व ६६व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोनाचा विजयीपथावर आणले. विजयाच्या उंबरठय़ावर असलेल्या बार्सिलोनाला ८५व्या मिनिटाला चेल्सीकडून धक्का मिळाला. गॅरी कॅहिलने हेडरद्वारे गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला.
बार्सिलोनाचा अँड्रेस एनीएस्टा लुजान आणि चेल्सीचा रॅडमेल फाल्को यांनी पहिल्याच संधीत गोल करून सामना १-१ असा बरोबरीत ठेवला. मात्र, अ‍ॅलेन हॅलिलोव्हीकने शूटआऊटची संधी गमावली आणि बार्सिलोनला पिछाडीवर टाकले. विक्टर मोसेसने कोणतीही चूक न करता गोल केला आणि चेल्सीला २-१ असे आघाडीवर ठेवले. बार्सिलोनाच्या तिसऱ्या प्रयत्नात गेरार्ड पिक्यू याचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडत गोलरक्षक कोर्टेईसने चेल्सीचा विजय जवळपास निश्चित केला. त्यानंतर रॅमिरेस आणि र्लोस रेमी यांनी अचूक गोल करत चेल्सीच्या विजयावर ४-२ अशी शिक्कामोर्तब केले. बार्सिलोनाकडून पेनल्टी शुटआऊटमध्ये दुसरा गोल सँड्रो रॅमिरेजने केला.