चेन्नईची मुंबईवर मात; बंगळुरुही पराभूत
बॅडमिंटन विश्वातील सार्वकालीन महान खेळाडूमध्ये गणना होणाऱ्या ली चोंग वेईचे आव्हान त्याच्यासमोर होते. याआधी लीविरुद्धच्या तिन्ही लढतीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या पराभवांतून बोध घेत भारताच्या प्रतिभावान बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने अफलातून खेळ करत ली चोंग वेईवर खळबळजनक विजय साकारला. दर्दी चाहत्यांचा ली चोंग वेईला पाठिंबा असताना श्रीकांतने तडाखेबंद स्मॅशेस, ड्रॉप, क्रॉसकोर्ट अशा सर्वागीण खेळासह उपस्थित चाहत्यांची मने जिंकली. श्रीकांतने ही लढत १५-१२, ६-१५, १५-७ अशी जिंकली. मात्र श्रीकांतच्या विजयानंतरही बंगळुरूला विजय मिळवता आला नाही.
महिला एकेरीत बंगळुरुच्या सुओ डीने १५-८, १५-११ अशा फरकाने सुपनिदा के.वर विजय मिळवला. मिश्र दुहेरीत हैदराबादच्या चार्स्टन मॉगेन्सेन व मार्किस किडो जोडीने हून थिएन होव आणि खिम व्ॉम लीम यांना १३-१५, १५-९, १५-१४ असे पराभूत करून २-१ अशी आघाडी मिळवली.
हुकमी लढतीत पारुपल्ली कश्यपने १५-१४, १५-१३ अशा फरकाने समीर वर्माचा पराभव करून हैदराबादची आघाडी ३-० अशी भक्कम केली. या पराभवामुळे बंगळुरुचा एक गुण वजा झाला. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा व जे.एफ. लिएल्से या जोडीने हैदराबादच्या ज्वाला गट्टा व किडो जोडीवर १५-१३, १५-१३ असा विजय मिळवून बंगळुरुला दिलासा दिला, परंतु ते संघाचा पराभव टाळू शकले नाही. हैदराबाद हंटर्सने गणितीय समीकरणांच्या बळावर ही लढत ३-२ अशी जिंकली.
अन्य लढतीत चेन्नई स्मॅशर्स संघाने मुंबई रॉकेट्स संघावर ४-३ असा निसटता विजय मिळवला. मुंबईकडून एच. एस. प्रणॉय आणि मॅथीआस बोए व व्हॅलदीमिर इव्हानोव्ह या जोडीन, तर चेन्नईकडून ख्रिस अ‍ॅडकॉक व पिए झेबादियाह, पी. व्ही. सिंधु आणि सिमॉन सँटोसो यांनी विजय मिळवला.