News Flash

जेतेपदासाठी चेन्नई-गोवा समोरासमोर

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या एफसी गोवा संघाला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा लाभणार आहे.

| December 20, 2015 01:38 am

दीड महिन्याच्या प्रवासानंतर इंडियन सुपर लीग स्पर्धेत जेतेपदासाठी चेन्नईयन एफसी आणि एफसी गोवा यांच्यात सामना रंगणार आहे.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या एफसी गोवा संघाला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा लाभणार आहे. चेन्नईच्या तुलनेत गोवा संघाने यंदा सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. साखळी गटात या दोन संघांत झालेल्या लढतींमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन लढती जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही संघांना घरच्या मैदानावर विजय साकारता आलेला नाही. अंतिम लढतीच्या निमित्ताने घरच्या मैदानावरची कामगिरी सुधारण्याची गोवा संघाला संधी आहे.

दिग्गज खेळाडू झिको यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या गोवा संघाने यंदाच्या हंगामात मुंबई सिटी एफसीचा ७-० असा धुव्वा उडवला होता. सलग चार सामने जिंकण्याची किमयाही त्यांनी केली होती. अंतिम लढतीपूर्वी गोव्याच्या नावावर २९ गोल आहेत. मात्र आक्रमक शैलीमुळेच गोवा संघाला चेन्नई आणि कोलकाता संघांविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दिल्ली डायनामोविरुद्धच्या लढतीत राफेल कोहेल्लो दुखापतग्रस्त झाला होता. मात्र अंतिम लढतीसाठी तो तंदुरुस्त ठरल्याने गोव्याच्या चिंता मिटल्या आहेत. डुडू ओमागेबनी, थोंगखोसिम हाओकिप, व्हिक्टोरिनो फर्नाडिझ आणि चिन्नाडोराई सबीथ यांच्यावर गोव्याची भिस्त आहे.

साखळी गटाच्या दहा लढतींनंतर चेन्नईच्या बादफेरीच्या आशा धुसर झाल्या होत्या. मात्र मार्को मॅटराझीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाने केरळा ब्लास्टर्स संघावर ४-१ असा विजय मिळवला. त्यानंतर दिल्ली डायनामो संघाचा ४-० असा धुव्वा उडला. त्यापाठोपाठ मुंबई सिटी एफसी संघाला ३-० असे नमवत त्यांनी बादफेरीच्या आशा जिवंत राखल्या. मेंडोंझा चेन्नईसाठी जमेची बाजू आहे. मेइलसन अल्वेस, धनचंद्र सिंग, मेहराजुद्दीन वाडू, हरमनजोत खाब्रा आणि मॅन्युले ब्लेइसी यांच्यावर चेन्नईची भिस्त आहे.

आयएसएलच्या पहिल्या हंगामात अ‍ॅटलेटिको डी कोलकाता संघाने जेतेपदावर नाव कोरले होते. यंदा कोलकाताला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागल्याने दुसऱ्या हंगामात नवा विजेता मिळणार आहे.

आयलीग आणि आयएसएल एकत्र करा – भूतिया

नवी दिल्ली : गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेली आयलीग ही सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे, तर आयएसएल चांगलीच यशस्वी ठरली आहे. त्यामुळे या दोन्ही फुटबॉल स्पर्धाचे एकत्रीकरण करावे, असे मत भारताचा माजी फुटबॉल कर्णधार आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा सल्लागार बायचुंग भूतियाने व्यक्त केले आहे.

भूतिया हा भारतीय फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होता. शंभरपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०११ साली भूतियाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती.

‘‘स्पष्टपणे सांगायचे झाल्यास आयलीग ही स्पर्धा अयशस्वी ठरल्याने आयएसएल स्पर्धेचा जन्म झाला. फुटबॉल चाहत्यांनीही आयलीगच्या सामन्यांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळते; पण दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आयएसएलने मात्र चांगली प्रसिद्धी मिळवली असून चाहतेही या सामन्यांचा आनंद लुटतात,’’ असे भूतिया म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:38 am

Web Title: chennai goa face to face for championship of isl
टॅग : Chennai,Goa,Isl
Next Stories
1 राजधानीतला टेनिस तमाशा
2 घरचा विरोध पत्करून जॉर्डनची टेबल टेनिसमध्ये कारकीर्द
3 श्रीलंकेला आघाडीची संधी
Just Now!
X