चेन्नईचा दिल्लीवर ३३ धावांनी विजय
चांगल्या सुरुवातीनंतर चेन्नईचा संघ अडचणीत सापडला. मात्र नेहमीप्रमाणे संकटमोचक धोनी मैदानात अवतरला. पहिल्या टप्प्यात एकेरी-दुहेरी धावा आणि नंतर तुफानी आक्रमण या खाक्याने धोनीने नाबाद ५८ धावांची खेळी केली आणि चेन्नईने १६८ धावांची मजल मारली. चेन्नईच्या टिच्चून गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या आणि चेन्नईने ३३ हा सामना जिंकला. या विजयासह चेन्नईने बाद फेरीच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करत गुणतालिकेत अव्वल स्थानी कब्जा केला.
या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच षटकांत मोहित शर्माने सेहवागला शून्यावर बाद केले. सातत्याने फलंदाज गमावणाऱ्या दिल्लीला ५ बाद ६३ अशा स्थितीतून  वॉर्नरने एकाकी झुंज देत चमत्काराच्या आशा जिवंत ठेवल्या. अॅल्बी मॉर्केलच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा वॉर्नरचा प्रयत्न फसला आणि दिल्लीच्या विजयाच्या आशा मावळल्या. वॉर्नरने ४४ धावा केल्या. दिल्लीचा संघ १३३ धावा करू शकला.
तत्पूर्वी, ६१ धावांच्या सलामीनंतर मुरली विजय धावचीत झाला तर माइक हसीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसला. सुरेश रैना ७ धावा काढून तंबूत परतल्यावर चेन्नईची ३ बाद ७४ अशी अवस्था झाली. कर्णधार महेंद्र सिंग धोनीने रवींद्र जडेजाच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. उमेश यादवने जडेजाला त्रिफळाचीत केले. यानंतर धोनीने नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी केली. धोनीने ३५ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५८ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ४ बाद १६८ (महेंद्र सिंग धोनी नाबाद ५८, मुरली विजय ३१, उमेश यादव २/२६) विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ९ बाद १३३ (डेव्हिड वॉर्नर ४४; अॅल्बी मॉर्केल ३/३२)
सामनावीर : महेंद्र सिंग धोनी