इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेनंतर भारतीय निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. यानंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. मात्र धोनी आता आपली मोठी सुट्टी संपवून लवकरच मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघ सज्ज झालेले आहेत. २९ मार्चरोजी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धोनी १ मार्चपासून सरावाला सुरुवात करणार असल्याचं कळतंय. चेन्नईच्या चेपॉक मैदानात धोनी ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी होईल. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून यंदाचं आयपीएल धोनीसाठी महत्वाचं असणार आहे.

या स्पर्धेत धोनीने चांगली कामगिरी केली, तर त्याच्यासाठी भारतीय संघाची दारं पुन्हा उघडी होऊ शकतात. संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखतीत याबद्दल माहिती दिली होती. सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हे खेळाडू याआधीच ट्रेनिंग कँपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात धोनी कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.