आयपीएलचा चौदावा हंगाम जसा जवळ येतोय तसेच या स्पर्धेत करोना प्रकरणांची संख्या वाढताना दिसत आहे. आज शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील 8 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर मागील वर्षी उपविजेता राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. आता चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) गोटातूनही अशाच प्रकारने धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

सीएसकेच्या कंटेंट टीमचा एक सदस्य करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र, सीएसकेच्या चाहत्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. कारण अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेंट टीमचा हा सदस्य कोणत्याही खेळाडूशी संपर्कात नव्हता. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या लीगपूर्वी करोनाच्या बातम्या समोर आल्या आहेत.

संबंधित सदस्य आयसोलेशनमध्ये

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सदस्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. खेळांडूच्या संपर्कात न आल्यामुळे चेन्नईने आपले सरावसत्र सुरूच ठेवले आहे. यंदाच्या हंगामात सीएसके आपला पहिला सामना 10 एप्रिलला मुंबईत दिल्ली कॅपिटल्सशी खेळणार आहे. भारतातील आणि मुख्यत: महाराष्ट्रातील वाढत्या करोनाच्या प्रकरणांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत हैदराबाद आणि इंदूरला एक पर्यायी स्थळ (standby venue) म्हणून ठेवले आहे.

सीएसकेच्या सूत्रांनी सांगितले की, संघाने यावेळी कोणताही प्रोटोकॉल तोडलेला नाही आणि संघ या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहे. कंटेट टीमचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पण यावेळी आम्ही संघासमवेत कोणत्याही प्रकारचा धोका घेत नाही आणि सर्व खबरदारी घेत आहोत.

आयपीएलच्या 13व्या सत्रातही सीएसकेच्या गटामध्ये करोनाचा शिरकाव झाला होता. संघाचा जलदगती गोलंदाज दीपक चहर आणि सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड यांच्यासह 13 सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते.