आयपीएलच्या गेल्या वर्षीच्या मोसमात अपेक्षित कामगिरी करता न आलेल्या धोनी ब्रिगेड अर्थात चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) चाहत्यांना यंदा या संघाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र, IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच चेन्नईला मोठा धक्का बसला होता. जोश हेझलवूडनं आयपीएलसाठी भारतात येण्यास नकार दिल्यामुळे चेन्नईसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. धोनीच्या भात्यामध्ये प्रभावी जलदगती गोलंदाजाची कमतरता जाणवू लागली होती. अखेर, धोनी ब्रिगेड फास्ट ट्रॅकवर आली असून जोश हेझलवूडप्रमाणेच दुसरा ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर जेसन बेरेनडॉर्फ आता चेन्नईच्या संघात दाखल झाला आहे. CSK नं नुकताच जेसनसोबत करार केला असून जोश हेझलवूडच्या जागेवर जेसन चेन्नईच्या संघाचा भाग झाला आहे. त्यामुळे धोनी ब्रिगेडची गोलंदाजी अधिक सक्षम वाटू लागली आहे.

चेन्नईसमोर होता जलदगती गोलंदाजीचा प्रश्न

काही दिवसांपूर्वीच भारताचे माजी क्रकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी धोनीची CSK प्लेऑफपर्यंत देखील पोहोचू शकली नाही, तर आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया दिली होती. आणि त्यासाठी चेन्नईची कमकुवक जलदगती गोलंदाजी हे एक प्रमुख कारण त्यांनी दिलं होतं. “चेन्नई सुपर किंग्जला लिलावामध्ये पूर्णपणे नव्याने टीम बांधण्याची गरज होती. पण ते शक्य झालेलं नाही. त्यांचे पहिले पाच सामने मुंबईत तर बाकीचे ४ सामने दिल्लीला आहेत. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर त्यांना वेगाने धावा कराव्या लागतील. त्यासोबत त्यांना अतिजलद गोलंदाजांची आवश्यकता भासेल. पण असे गोलंदाज चेन्नईकडे नाहीत”, असं देखील आकाश चोप्रा म्हणाले होते.

“CSK प्लेऑफआधीच बाहेर पडल्यास आश्चर्य वाटणार नाही”, भारताच्या माजी क्रिकेटपटूचं भाकित!

१० एप्रिलला चेन्नईचा पहिला सामना

दरम्यान, आता जेसन बेरेनडॉर्फच्या समावेशामुळे चेन्नईची गोलंदाजी समतोल झाल्याचं दिसत आहे. जेसन बेरेनडॉर्फनं आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११ एकदिवसीय आणि ७ टी-२० सामने खेळले आहेत. IPL 2019 मध्ये जेसन मुंबई इंडियन्सकडून ५ सामने खेळला होता. या सामन्यांमध्ये त्याने ५ विकेट्स देखील घेतल्या होत्या. जेसननं आत्तापर्यंत एकूण ७९ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ९० विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या अनुभवाचा चेन्नईला नक्कीच फायदा होऊ शकेल. १० एप्रिल रोजी चेन्नई आपला सलामीचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळणार आहे.

 

रवींद्र जडेजांच पुनरागमन!

काही दिवसांपूर्वीच धोनीसाठी चिंतेचा विषय ठरलेला अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा पुन्हा फिट होऊन संघात परतला आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जाडेजा खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये जडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही.

धोनी सेनेसाठी गूड न्यूज! अष्टपैलू खेळाडू झाला ‘फिट’

अवघ्या ९ दिवस आधी हेझलवूडची माघार

याआधी चेन्नई सुपरकिंग्जनं जोश हेझलवूडला आयपीएल २०२०पूर्वी २ कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये हेझलवूडनं चेन्नईसाठी ३ सामने खेळले होते. “गेल्या १० महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी मी बायोबबल आणि क्वारंटाईनमध्ये राहिलो आहे. त्यामुळे मी असं ठरवलं की आता क्रिकेटमधून मी पुढचे २ महिने आराम करण्याचा आणि माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला”, असं हेझलवूडनं स्पष्ट केलं आहे.

हेझलवूडआधी जोश फिलिप (RCB) आणि मिचेल मार्श (SRH) या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी देखील यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे.