करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा आता १५ एप्रिलपासून खेळवली जाईल. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आपलं सरावसत्रही रद्द केलं आहे. चेपॉक मैदानात चेन्नई सुपरकिंग्जचे खेळाडू सराव करत होते.

अवश्य वाचा – ६०० हून अधिक नोकऱ्या, हजारो कोटींचा तोटा?? करोनामुळे बीसीसीआयवर आर्थिक संकट

इंडिया टुडे वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार करोनामुळे स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर, धोनी-रैना आणि इतर महत्वाच्या खेळाडूंनी सरावसत्रात न सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, “सध्याच्या घडीला स्पर्धा पुढे ढकलणं हा एकमेव पर्याय योग्य होता, कारण खेळाडूंनी सुरक्षित राहणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही स्पर्धा पुढे ढकलली आहे. येत्या काही दिवसांत काय घडामोडी घडतायत त्यावरुन स्पर्धेचं भवितव्य ठरेल, आता काही बोलणं योग्य ठरणार नाही”, सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली.

२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा आता १५ एप्रिलपासून सुरु होणार आहे. मात्र सध्याच्या घडीला आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द करणं बीसीसीआयला परवडणारं नाही, तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय, संघमालक आणि सामन्यांचं थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला अंदाजे ३ हजार कोटींचा फटका बसू शकतो.

अवश्य वाचा – आयपीएलचं आयोजन पुढे ढकलण्याच्या निर्णयावर गांगुली म्हणतो…