चीनच्या मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांच्यासह २० भारतीय जवानांना वीरमरण आले. पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान शहीद झाले होते, पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे एकूण २० जवान शहीद झाले. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिकदेखील भारतीय लष्कराकडून या संघर्षांत ठार करण्यात आले.

चीनच्या सैनिकांनी सीमारेषेवर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. असे असताना चेन्नई सुपर किंग्ज संघातील कर्मचारी वृंदातील डॉक्टरने शहीद जवानांच्या शवपेट्यांबाबत एक वादग्रस्त ट्विट केले. ते ट्विट असंवेदनशील असल्याचे म्हणत ट्विटर युझरने त्यावर टीका केली. त्यानंतर CSK च्या संघ व्यवस्थापनाने त्या डॉक्टरवर कारवाई केली.

“चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापनाला कोणतीही माहिती न देता डॉ. मधू थोट्टापिल्लील यांनी ते ट्विट केले होते. त्यांच्या त्या वादग्रस्त ट्विटमुळे त्यांना त्यांच्या संघातील डॉक्टर या पदावरून निलंबित करण्यात आले आहे. त्या ट्विटमध्ये जवानांबद्दल आक्षेपार्ह विधान असल्याबाबत आम्ही दिलगीरी व्यक्त करतो”, असे ट्विट करत CSK ने डॉक्टरवर केलेल्या कारवाईची माहिती दिली.

दरम्यान, भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही शहीद जवानांना त्यांच्या बलिदानाबद्दल सलाम केला.

“गलवाण खोऱ्यात आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना सलाम! जवानांबद्दल मला मनापासून आदर आहे. जवानांएवढा निःस्वार्थ आणि धाडसी कोणीही नसतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की या कठीण प्रसंगात देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो. तसेच, शहीद जवानांना आत्म्यास शांती लाभो”, असे ट्विट विराटने केले.

सेहवागने या प्रकरणी आपला चीनवरील रोष व्यक्त केला. “कर्नल संतोष बाबू यांनी दिलेल्या बलिदानासाठी त्यांना सलाम. एकीकडे संपूर्ण जग करोनासारख्या अतिशय भयानक व्हायरसशी लढत असतानाच चीनकडून अशा प्रकारे वर्तणूक योग्य नाही. मला आशा वाटते की चीनने लवकर सुधरावं”, अशा शब्दात सेहवागने आपला राग व्यक्त केला.