आयपीएलचे चौदावे पर्व आता काही दिवसांवर आले आहे. 9 एप्रिल ते 30 मे असे हे पर्व चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. आयपीएल ही स्पर्धा टी-20 क्रिकेटमधील बलाढ्य स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे, ही क्रिकेटविश्वात खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे. यंदाच्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके)आपली तयारी आधीच सुरू केली आहे. आता आपल्या फलंदाजीत बळकटी आणण्यासाठी त्यांनी थेट अफगाणिस्तानवरून नेट बॉलर (गोलंदाज) मागवला आहे.

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकी नेट बॉलर म्हणून सीएसकेच्या गटात सामील झाला आहे. सीएसरेने फारुकीशी  एक करार केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही (एसीबी) फारूकीचे ट्विटरवर फोटो पोस्ट करत तो चेन्नईला जात असल्याचे सांगितले.

 

एसीबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, युवा वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीने भारतात जाण्यासाठी देश सोडला आहे. तेथे तो आयपीएलच्या आगामी मोसमात सीएसकेचा नेट बॉलर असेल.

फारुकीने 20 मार्च रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने अफगाणिस्तानकडून गोलंदाजीला सुरुवात केली आणि पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने पहिला बळी घेतला.

गुरुवारी सीएसकेचे सराव शिबिर चेन्नईहून मुंबईत हलवण्यात आले. तीन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेला सीएसकेचा संघ पाच सामने मुंबईत खेळणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात हा संघ 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सशी, 16 एप्रिलला पंजाब किंग्जशी, 19 एप्रिलला राजस्थान रॉयल्सशी, 21 एप्रिलला कोलकाता नाइट रायडर्सशी आणि 25 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना खेळेल.