चेन्नई-हैदराबाद यांच्यात आज अंतिम सामना

चेन्नई आणि हैदराबाद ही दक्षिणेतील शहरे. परंतु क्रिकेटच्या नकाशावर यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अव्वल दोन स्थानांवर विराजमान. त्यामुळेच रविवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील अंतिम सामन्याला ‘दाक्षिणात्य भाऊबंदकी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दोन वर्षांनंतर आयपीएलच्या व्यासपीठावर परतणारा चेन्नईचा संघ तिसऱ्या विजेतेपदासाठी उत्सुक आहे, तर २०१६ नंतर दुसरे जेतेपद पटकावण्याचे हैदराबादचे ध्येय आहे. पाच दिवसांपूर्वी हे दोन दक्षिणेतील संघ पात्रता-१ (क्वालिफायर-१) सामन्यात भिडले होते. त्या वेळी सलामीवीर फॅफ डू प्लेसिसने अखेपर्यंत जिद्दीने किल्ला लढवत चेन्नईला जिंकून दिले होते. चेन्नईने नऊ आयपीएलपैकी सात वेळा अंतिम फेरी गाठत आपले वर्चस्व दाखवले आहे.

चेन्नईच्या फलंदाजीची मदार शेन वॉटसन, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू या त्यांच्या आघाडीच्या फळीवर आहे. डू प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो महत्त्वाच्या क्षणी जबाबदारीने खेळतात. याशिवाय रवींद्र जडेजा, हरभजन सिंग आणि शार्दूल ठाकूर यांच्याकडे गोलंदाजीप्रमाणेच फटकेबाजी करण्याची क्षमता आहे.

हैदराबादने शुक्रवारी पात्रता-२ (क्वालिफायर-२) सामन्यात दोन वेळा विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा १४ धावांनी पराभव करून अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले. याचप्रमाणे चार पराभवांची मालिका हैदराबादने खंडित केली. रशिद खानने आधी फलंदाजीत १० चेंडूंत ३४ धावांची खेळी साकारली. मग १९ धावांत ३ बळी घेण्याची किमया साधली. याशिवाय त्याने दोन अप्रतिम झेल आणि एका फलंदाजाला धावचीतसुद्धा केले. अगदी पात्रता-१ सामन्यात रशिदने चेन्नईची २ बाद ११ अशी केविलवाणी अवस्था केली होती. मात्र डू प्लेसिसने संघाला तारले. सचिन तेंडुलकरकडून ‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज’ अशा शब्दांत शाबासकी मिळवणाऱ्या रशिदच्या साथीला भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल या मध्यमगती गोलंदाजांची कुमक आहे. हैदराबादच्या फलंदाजीची भिस्त शिखर धवन, केन विल्यम्सन यांच्यावर आहे.

हैदराबादकडे सामन्याचा निकाल पालटण्याची गुणवत्ता असणारा कार्लोस ब्रेथवेट हा अष्टपैलू खेळाडू आहे. २०१६ मध्ये तो वेस्ट इंडिजच्या ट्वेन्टी-२० मधील विश्वविजेतेपदाचा शिल्पकार ठरला होता. बाद फेरीत चेन्नईविरुद्ध नाबाद ४३ धावा काढणाऱ्या ब्रेथवेटने कोलकाताविरुद्धच्या अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली.

लक्षवेधी खेळाडू

  • अंबाती रायुडू : रायुडू हा चेन्नईच्या फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याने यंदाच्या हंगामातील १५ सामन्यांत एकंदर ५८६ धावा केल्या आहेत. साखळीतील दोन्ही सामन्यांमध्ये रायुडू चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एका सामन्यात शतक झळकावले, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद ७९ धावा काढल्या होत्या. मात्र बाद फेरीतील सामन्यात तो अपयशी ठरला होता. कोणत्याही स्थानावर आणि कोणत्याही परिस्थितीत संघाची गरज ओळखून फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
  • रशिद खान : रशिद हा हैदराबादचा यंदाच्या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू आहे. अफगाणिस्तानच्या या १९ वर्षीय लेग-स्पिनरने १६ सामन्यांमध्ये २१ बळी मिळवले आहेत. त्याच्या चकवणाऱ्या गुगलीला सामना करताना भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडते. पात्रता-१ सामन्यात धोनीसारख्या अनुभवी फलंदाजालाही त्याने बाद केले. पात्रता-२ सामन्यात धडाकेबाज फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि दिमाखदार क्षेत्ररक्षणात वर्चस्व दाखवणारा रशिदच हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

खेळपट्टी

पात्रता-१ सामन्याप्रमाणेच वानखेडेची खेळपट्टी गोलंदाजांना पुरेशी साथ देईल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना आणि नंतर फिरकी गोलंदाजांना ती अनुकूल ठरेल. त्यामुळे १७०-१७५ ही धावसंख्या आव्हानात्मक ठरेल. दवाची भूमिका महत्त्वाची असल्याने नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी घेणे योग्य ठरेल.

कर्णधारांचा सामना

  • महेंद्रसिंग धोनी : कठीण परिस्थितीत संघाला सावरण्यासाठी झुंजार फलंदाजी करण्याची क्षमता धोनीकडे आहे. भारतातील खेळपट्टय़ांचा पुरेसा अनुभव असल्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीतील बदल त्यानुसार करण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे.
  • केन विल्यम्सन : स्पर्धेतील सर्वाधिक एकूण धावा विल्यम्सनच्या नावावर आहेत. आघाडीवर राहून नेतृत्व करण्यात तो पटाईत आहे. गोलंदाजांमध्ये आणि क्षेत्ररक्षणात बदल करीत राहण्याचे त्याचे तंत्र अप्रतिम आहे. अखेरच्या षटकांमध्ये कार्लोस ब्रेथवेटवर त्याचा भरवसा आहे.

संघ

  • चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ डू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, अंबाती रायुडू, दीपक चहर, के. ए. आसिफ, कनिश सेठ, लुंगी एन्गिडी, ध्रुव शोरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शिट्झ शर्मा, मोनू कुमार, चैतन्य बिश्नोई, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, शार्दूल ठाकूर, एन. अ‍ॅगेडीसान, डेव्हिड विली.
  • सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हुडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसूफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बसिल थम्पी, टी. नटराजन, सचिन बेबी, बिपूल शर्मा, मेहदी हसन, तन्मय अगरवाल, अ‍ॅलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशिद खान, शकिब अल हसन, मोहम्मद नबी, ख्रिस जॉर्डन.