आतापर्यंत  सुरेश रैनाला आयपीएलमध्ये सातत्याने कामगिरी करता येत नव्हती, तरीही त्याच्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विश्वास टिकून होता. तोच विश्वास नाबाद शतक झळकावत रैनाने सार्थकी लावला आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. हंगामातील तिसरे शतक झळकावत रैना किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांवर बरसला आणि संघाला १८६ धावांचा पल्ला गाठून दिला. या आव्हानाचा पंजाबने चांगला पाठलाग केला, पण भेदक मारा करत अटीतटीच्या लढतीत चेन्नईने त्यांच्यावर १५ धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतील सलग सातव्या विजयासह चेन्नईने आयपीएल क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान १८ गुणांसह कायम ठेवले
आहे.
नाणेफेक जिंकत घरच्या मैदानावर चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रैनाने हा निर्णय योग्य ठरवला. वृद्धिमान साहा (१८) आणि ‘ऑरेंज कॅप’ पटकावलेल्या माइक हसीने (३५) संघाला चांगली सुरुवात करून दिली होती, पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार धोनीही (२) स्वस्तात धावचीत झाला. १३व्या षटकात ३ बाद ९३ अशी अवस्था असताना रैनाने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि यशस्वीरीत्या निभावलीही. रैनाने अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश करत ५३ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची खेळी साकारत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

चेन्नईच्या १८७ धावांचा पाठलाग करताना पंजाबचे दोन्ही सलामीवीर ३६ धावांत तंबूत परतले होते. पण त्यानंतर शॉन मार्श आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी रचत संघाची विजयाची आशा जिंवत ठेवली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. मार्शने ५१ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ७३ धावांची खेळी साकारली. मार्श बाद झाल्यावर मिलरने संघाच्या आशा जिवंत ठेवल्या खऱ्या, पण त्याला अन्य फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्याने संघाच्या कपाळावर विजयाचा टिळा लावता आला नाही. मिलरने अखेपर्यंत लढत देत २६ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर नाबाद ५१ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद १८६ (सुरेश रैना नाबाद १००, माइक हसी ३५; परविंदर अवाना २/२९) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १७१ (शॉन मार्श ७३, डेव्हिड मिलर नाबाद ५१; ड्वेन ब्राव्हो ३/३४)
सामनावीर : सुरेश रैना.

टॉम मूडी, सनरायजर्स हैदराबादचे प्रशिक्षक
मुंबई इंडियन्सबरोबरच्या सामन्यात आम्ही चांगला विजय मिळवला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत आम्ही शिस्तबद्ध कामगिरी केली. सलामीवीर शिखर धवनची दर्जेदार फलंदाजी पुन्हा एकदा पाहता आली.