इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या गुणतालिकेतील अव्वल संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि तळाचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यात रविवारी होणारा सामना एकतर्फीच होण्याची चिन्हे आहेत. चेन्नईचा संघ आणखी एका दमदार विजयासह बाद फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे.

गतविजेत्या चेन्नईने सनरायजर्स हैदराबादविरुद्धचा आपला याआधीचा सामना  गमावला आहे. परंतु यंदाच्या हंगामातील तो त्यांचा दुसरा पराभव आहे. नऊ सामन्यांत सात विजयांसह १४ गुण त्यांच्या खात्यावर जमा आहेत. त्यामुळे एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील विजयासह अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवणे त्यांच्यासाठी कठीण नाही. मागील सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळू शकला नव्हता, मात्र रविवारच्या सामन्यात तो खेळू शकेल.

‘आयपीएल’च्या यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना चेन्नई-बेंगळूरुत झाला होता. चेन्नईत तो आरामात जिंकला होता. त्यानंतर चेन्नईचा आलेख उंचावत गेला, तर बेंगळूरुचा खालावत राहिला. शुक्रवारी बेंगळूरुने ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्सला हरवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. बेंगळूरुचा नऊ सामन्यांमधील हा दुसरा विजय ठरला. बेंगळूरुच्या विजयाचा मोईन अली शिल्पकार ठरला. त्याने धडाकेबाज फलंदाजीसह प्रभावी गोलंदाजीसुद्धा केली. या सामन्यात एबी डी’व्हिलियर्सची अनुपस्थिती कर्णधार विराट कोहलीने जाणवू दिली नाही. त्याने जबाबदारीने खेळत यंदाच्या हंगामातील पहिले शतक साकारले. चेन्नईविरुद्ध डी’व्हिलियर्ससुद्धा संघात परतू शकेल, अशी अपेक्षा आहे.

चेन्नईच्या धोनीने आठ सामन्यांत दोन अर्धशतकांसह एकूण २३० धावा केल्या आहेत. याशिवाय चाळिशीचा इम्रान ताहीरवर त्यांच्या गोलंदाजीची भिस्त आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या फिरकी गोलंदाजाने आतापर्यंत १३ बळी मिळवले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्ज, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, डेव्हिड विली, दीपक चहर, स्कॉट कुगेलिन, एन. जगदीशन (यष्टीरक्षक).

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, डेल स्टेन, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज, हेन्रिच क्लासीन (यष्टीरक्षक), मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्ससिलेक्ट १