चेन्नईतील चेपॉक मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी पहिला वनडे सामना रंगणार आहे. चेपॉक अर्थात एम. ए. चिदम्बरम स्टेडियमचे माजी क्युरेटर के पर्थसार्थी यांनी या मैदानावरील पहिल्याच सामन्यात धावांचा पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे. खेळपट्टीबाबत पर्थसार्थी म्हणाले की, “चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात २८०-३०० धावा सहज होऊ शकतील. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर सराव सामना खेळला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय अध्यक्षीय संघ यांच्यात रंगलेला सराव सामना हा चेपॉकच्या मुख्य खेळपट्टीवर नाही, तर सहा क्रमांकाच्या खेळपट्टीवर खेळवण्यात आला होता. पहिली लढत या मैदानातील मध्यवर्ती असलेल्या चौथ्या खेळपट्टीवर होणार आहे. याच मुख्य खेळपट्टीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येतात. चेन्नईतील वातावरणानुसार, खेळपट्टी आपला रंग दाखवू शकते. तसेच साधारणत: ३३ अंश सेल्सियस तापमानात खेळणे हे खेळाडूंसाठी मोठे आव्हान असेल”

भारत दौऱ्यावर स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने चेन्नईत बीसीसीआय अध्यक्षीय संघाविरुद्ध १०१ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात स्मिथसह मार्कस स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेड यांनी केलेल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ३४७ धावांचा डोंगर उभारता आला होता. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू स्टॉयनिसने भारताला पराभूत करण्यासाठी ३५० हून अधिक धावा कराव्या लागतील, असे सांगितले होते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या निश्चयानेच मैदानात उतरतील. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्यांचा चांगला आनंदही घेता येईल.