27 February 2021

News Flash

अनमोल ‘भारतरत्न’

आनंद हा खेळाच्या राजकारणापासून सतत दूर राहिला आहे.

भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद.

मुंबई विमानतळावर नुकताच घडलेला एक प्रसंग. एक व्यक्ती विमानतळावरील आगमन कक्षातून बाहेर पडली. लगेचच त्याच्याभोवती अनेक चाहत्यांचा, विशेषत: लहान मुलामुलींचा गराडा पडला. त्यांना या व्यक्तीने स्वाक्षरी दिली, सेल्फी व छायाचित्रे काढण्याचीही संधी दिली. त्यांचे समाधान झाल्यानंतरच ही व्यक्ती मोटारीत बसली. ही व्यक्ती कोणी सामान्य नव्हे तर ती व्यक्ती होती सहा वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद.

इच्छाशक्तीला सरावाची व आत्मविश्वासाची जोड दिली तर खेळाच्या दृष्टीने प्रौढ वयातही जगज्जेतेपद मिळवता येते हे आनंदने नुकतेच दाखवून दिले आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी त्याने जलद (रॅपिड) डावांच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहोर नोंदवली. हे यश मिळविताना त्याने विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनसह अनेक बलाढय़ खेळाडूंचा पाडाव केला. त्याचबरोबर त्याने ब्लिट्झ प्रकारातही कांस्यपदकाची कमाई केली आहे. या दोन्ही स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी लंडन क्लासिक स्पर्धेत आनंदला सर्वात शेवटचे स्थान मिळाले होते. या पराभवानंतरही खचून न जाता आनंदने जागतिक स्पर्धेसाठी भरपूर गृहपाठ केला असावा हेच त्याच्या दोन पदकांवरून सिद्ध होते.

आनंदने कार्लसनविरुद्ध दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदाची स्पर्धा गमावली, त्या वेळी समाजमाध्यमांद्वारे अनेकांनी आनंदवर शिवराळ भाषेत टीका केली होती. आनंदने बुद्धिबळ सोडून सागरगोटे खेळ खेळावा, अशीही टीका झाली होती. आनंदने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रत्येक श्रेष्ठ खेळाडूच्या कारकीर्दीत कामगिरीचे उतारचढाव येतच असतात हे त्याला माहीत आहे. त्यामुळेच टीकाकारांची तोंडे दुखतील किंवा त्यांची लेखणी बंद होईल असे गृहीत धरून त्याने नेहमीच आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

ज्या देशात क्रिकेट हा लोकांच्या नसानसांत भिनला आहे आणि जो धर्म मानला जातो अशा भारतात बुद्धिबळाचे युग निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. हा खेळ खरे तर आपला प्राचीन क्रीडा प्रकार मानला जातो. मात्र तरीही या खेळात कारकीर्द करणे हे पूर्वीच्या काळी हास्यास्पद मानले जात होते. अतिशय प्रतिकूल आव्हानांना सामोरे जात आनंदने बुद्धिबळातही कारकीर्द करता येते हे दाखवून दिले. आनंदने किती खेळाडू निर्माण केले, असा प्रश्न अनेक जण नेहमी विचारत असतात. आनंद हा अजूनही जागतिक स्तरावर खेळत आहे, त्यामुळेच आपण गुरुपद अद्याप स्वीकारलेले नाही, असे तो आवर्जून सांगतो. एका वेळी स्वत:ची कारकीर्द व प्रशिक्षकपद या दोन्ही गोष्टी सांभाळणे कठीण असते, असे त्याचे स्पष्ट मत आहे. एक मात्र नक्की, की अनेक ग्रँडमास्टर व आंतरराष्ट्रीय मास्टर्स आपल्या देशात घडविण्यासाठी आवश्यक असणारी पाश्र्वभूमी तयार केली.

कोणतेही यश सहजासहजी मिळत नसते. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे!’ असे म्हटले जाते. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी अभूतपूर्व यश मिळविले ते त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. अफाट कष्ट करीत व संघर्ष करीत त्यांनी हे यश साध्य केले आहे. आनंदच्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्द नाही. व्हॅसेली टोपालोव्हविरुद्धच्या विश्वविजेतेपदाच्या लढतीच्या वेळी आनंदला किती संघर्ष करावा लागला याची तुलना करणे अयोग्य होईल. चाळीस तासांचा गाडीप्रवास करून आल्यानंतर केवळ एक दिवसाच्या विश्रांतीनंतर जगज्जेतेपदाच्या लढाईत उतरणे हे केवळ आनंदच करू शकतो. दुसरा कोणी त्याच्या जागी असता तर त्याने माघारच घेतली असती. प्रतिकूल परिस्थितीत जुळवून घेणे व स्वत: नमते घेणे हा आनंदचा स्थायिभाव आहे.

एखादा रणजी सामना नाही खेळला तर लगोलग हा क्रिकेटपटू जमिनीपासून काही इंचावरून चालत असतो. आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूला स्वर्ग चार बोटांवर असल्याचे वाटत असते. आनंद या खेळाडूंपासून खूपच वेगळा आहे. विश्वविजेतेपदाचा षटकार ठोकल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवरच आहेत. आनंद हा भारतासाठी खेळत नाही, अशी तक्रार अनेक वेळा केली जाते, मात्र त्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यापूर्वीही भाग घेतला आहे. आगामी ऑलिम्पियाडमध्ये भारताकडून खेळण्याचे त्याने मान्य करीत आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. आनंद हा खेळाच्या राजकारणापासून सतत दूर राहिला आहे.

त्याने कधीही आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा यासाठी दबावतंत्र वापरलेले नाही किंवा आग्रह धरलेला नाही; किंबहुना विश्वविजेतेपद मिळविल्यानंतर मायदेशात परत आल्यानंतरही क्रिकेटपटूंचा जसा भव्य सत्कार केला जातो तसा आनंदचा कधीही गौरव झालेला नाही. तरीही त्याने कधीही त्याबाबत तक्रार केलेली नाही. आपल्यावर असलेले कोटय़वधी चाहत्यांचे प्रेम हाच आपला गौरव असतो असेच तो मानत आला आहे. एखाद्या क्रिकेटपटूला भारतरत्न देण्यासाठी किती दबावतंत्र वापरले जाते हे सचिन तेंडुलकरला हा मान देताना सर्वानी अनुभवले आहे. आनंद याने कधीही आपल्याला हा सन्मान मिळावा यासाठी राजकीय नेत्यांमार्फत दडपण आणलेले नाही. आपल्या नशिबात असेल तर कोणताही सन्मान आपल्याला मिळणारच अशी त्याला खात्री असते. तसेच एखादा सन्मान मिळविण्यासाठी आवाज उठविणे हे त्याच्या स्वभावातच नाही. असे सन्मान मिळाले नाही तरी आपले करिअर दिमाखात सुरू असते याची त्याला पूर्ण कल्पना आहे. असंख्य चाहत्यांकडून मिळणारे प्रेम हाच आपला खरा सन्मान असतो असेच तो मानत आला आहे. खऱ्या अर्थाने तो अनमोल ‘भारतरत्न’ आहे.

मिलिंद ढमढेरे – milind.dhamdhere@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 1:20 am

Web Title: chess grandmaster viswanathan anand
Next Stories
1 आयपीएल लिलावामध्ये ११२२ क्रिकेटपटूंचा समावेश
2 रूट खेळणार, वॉर्नरबाबत साशंकता
3 फेडरेशन चषक कबड्डी – फेब्रुवारीत मुंबईत रंगणार ८ सर्वोत्तम संघांचा मुकाबला
Just Now!
X