News Flash

चौसष्ट घरांचा सम्राट कोण होणार ?

कीकडे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अडीच तपांच्या देदीप्यमान कारकिर्दीला निरोप देण्याकडे तमाम देशवासीयांचे लक्ष एकवटले असतानाच

| November 3, 2013 05:47 am

कीकडे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अडीच तपांच्या देदीप्यमान कारकिर्दीला निरोप देण्याकडे तमाम देशवासीयांचे लक्ष एकवटले असतानाच सहाव्यांदा विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान करण्यासाठी विश्वनाथन आनंद सज्ज होत आहे. सचिनच्या निरोपाच्या तयारीमुळे चेन्नईत होणारी विश्वविजेतेपदाची लढत झाकोळली गेली असली तरी बुद्धिबळ चाहत्यांना मात्र मायदेशात विश्वविजेतेपदाचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि आव्हानात्मक अडचणींवर मात करत यशाचे शिखर गाठण्यात विश्वनाथन आनंदचा हातखंडा आहे. २०१०मध्ये सोफिया येथे व्हेसेलिन टोपालोव्हविरुद्ध झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीसाठी आनंदला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. ज्वालामुखीच्या धूळीकणांमुळे फ्रँकफर्टला जाणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली. आनंदने लढत तीन दिवसांनी पुढे ढकलण्याची विनंती केली. पण संयोजकांनी त्याची विनंती फेटाळून लावली. अखेर ४० तासांचा रस्तेमार्गाने प्रवास करून आनंद थेट लढतीसाठीच मैदानात उतरला आणि विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात घातली. आता त्याची विश्वविजेतेपदाची आगामी लढत चेन्नईत म्हणजे घरच्या रणांगणावर होत असल्यामुळे आनंदसाठी अनुकूल परिस्थिती मानली जात आहे. तरीही आनंदपेक्षा जवळ जवळ निम्म्याने तरुण असलेल्या मॅग्नस कार्लसनला आपल्या वयाचा आणि आक्रमकपणाचा फायदा होईल, अशी चर्चा आहे.
विद्यमान विश्वविजेता आनंद व आव्हानवीर कार्लसन यांच्यात चेन्नईत ७ नोव्हेंबरपासून विश्वविजेतेपदाच्या लढतीला प्रारंभ होणार आहे. या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत २९ वेळा क्लासिकल लढती झाल्या आहेत. त्यापैकी सहा डाव आनंदने जिंकले आहेत तर तीन डाव कार्लसनने जिंकले आहेत. उर्वरित २० डाव बरोबरीत राहिले आहेत. कार्लसनने २००९नंतर हे तीन विजय मिळविले आहेत. आनंदपेक्षा कार्लसन हा तरुण असल्यामुळे बुद्धिमत्तेबाबत त्याला फायदा होईल, असे मानले जात आहे. त्यातही गेल्या दीड वर्षांत कार्लसन हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. असे असले तरी विश्वविजेतेपदाच्या लढतीबाबत आनंदने जास्त पावसाळे पाहिले आहेत. त्याने कारकिर्दीत गॅरी कास्पारोव्ह, अनातोली कापरेव्ह यांच्यासारख्या रथीमहारथींवर मात केली आहे.
ही लढत घरच्या मैदानावर होत असली तरी त्याचे दडपण आनंदवर राहणार नाही. कोणतेही व कसलेही दडपण न घेता खेळण्याबाबत त्याची ख्याती आहे. उलट कार्लसन याला चेन्नईतील दमट हवामानाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वातानुकूलित सभागृहात ही लढत होणार असली तरी विश्रांतीच्या वेळी भटकंती करण्याची कार्लसनची सवय त्याला त्रासदायक ठरण्याची शक्यता अधिक आहे.    
आनंदने आजपर्यंत पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविले आहे. नवी दिल्ली येथे १९९९-२००० च्या विश्वविजेतेपदाची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १२८ खेळाडूंमधून आनंदने अंतिम फेरीत स्थान मिळविले. तेहरान येथे झालेल्या अंतिम फेरीत स्पेनच्या अ‍ॅलेक्सी शिरोव्हविरुद्धच्या सहा डावांच्या लढतीत आनंदने पहिल्या चार डावांपैकी तीन डाव जिंकले व एक डाव बरोबरीत रोखून विजेतेपद मिळविले. त्याच्या या विश्वविजेतेपदामुळे भारतीय खेळाडूही विश्वविजेता होऊ शकतो, हे त्याने दाखवून दिले.
आनंदने २००७मध्ये मेक्सिको सिटी (मेक्सिको) येथे पुन्हा विश्वविजेतेपद मिळवीत आपण २०००मध्ये मिळविलेले विश्वविजेतेपद म्हणजे चमत्कार नव्हता, हे दाखवून दिले. जगातील सर्वोत्तम आठ खेळाडूंमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. दुहेरी साखळी पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत आनंदने १४ पैकी ९ गुण मिळवत ही स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे त्याने व्लादिमीर क्रॅमनिक व बोरिस गेल्फंड यांना पिछाडीवर टाकत हे यश मिळविले.  
जर्मनीतील बॉन येथे २००८मध्ये मॅच पद्धतीने झालेल्या या लढतीत आनंदने क्रॅमनिकवर मात केली आणि तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. बारा डावांच्या या लढतीत आनंदने ११व्या डावालाच ६.५ गुणांची कमाई करत विजेतेपद निश्चित केले. त्याने तीन डाव जिंकले व एक डाव गमावला. उर्वरित डाव बरोबरीत सुटले.
सोफिया (बल्गेरिया) येथे २०१०मध्ये आनंदने व्हॅसेलिन टोपालोव्हविरुद्धच्या लढतीत मिळविलेले विश्वविजेतेपद संस्मरणीय होते. त्या वेळी युरोपात ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या धुरांमुळे विमानांची उड्डाणे स्थगित झाली होती. त्यामुळे ऐनवेळी बसप्रवास करण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय आनंदपुढे नव्हता. या लढतीत त्याला फ्रँकफर्ट ते सोफिया असा चाळीस तासांचा बसप्रवास करावा लागला होता. त्यानंतर अवघ्या एक दिवसाच्या विश्रांतीनंतर तो विश्वविजेतेपदाची लढत खेळला आणि जिंकलाही. आनंदच्या जागी कॅस्पारोव्ह किंवा अनातोली कापरेव्ह यांच्यासारखा खेळाडू असता तर त्यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाला ही लढत पुढे ढकलण्यास भाग पाडले असते. प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेणे व स्वत: नमते घेणे, हा आनंदचा स्थायिभाव आहे.
मॉस्को येथे २०१२मध्ये बोरिस गेल्फंड या इस्रायलच्या खेळाडूविरुद्ध त्याची विश्वअजिंक्यपदाची लढत झाली. त्यापूर्वीच्या मोसमात त्याची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नव्हती. साहजिकच अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी गेल्फंडचे पारडे जड राहील, असे मत व्यक्त केले होते. बारा डावांच्या लढतीमधील सातवा डाव जेव्हा गेल्फंडनेजिंकला, त्या वेळी माजी विश्वविजेता गॅरी कॅस्पारोव्हने आनंदच्या कारकिर्दीतील उतरणीचा काळ सुरू असल्याची जाहीर टीका केली. अर्थात आनंदने या टीकेकडे दुर्लक्षच केले. आठव्या डावात आनंदने केवळ १७ चालींमध्ये गेल्फंडवर सनसनाटी मात केली. विश्वचषकासाठी झालेल्या आजपर्यंतच्या लढतींमधील तो सर्वात वेगवान विजय होता. बारा डावांनंतर दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी सहा गुण झाले. त्यानंतर झालेल्या टायब्रेकर डावांमध्ये आनंदने २.५-१.५ अशा गुणांनी विजय मिळविला.
या विश्वविजेतेपदांबरोबरच आनंदने कारकिर्दीत अन्य अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकल्या आहेत. त्याची दिमाखदार कारकीर्द लक्षात घेता त्याला पराभूत करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कार्लसनला सर्वोच्च कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. त्यामुळेच चेन्नईतील आगामी लढत बुद्धिबळ चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

  अशी होणार लढत!
या लढतीचा उद्घाटन समारंभ ७ नोव्हेंबरला होईल. लढत १२ डावांची असून पहिला डाव ९ नोव्हेंबरला खेळविला जाईल. २६ नोव्हेंबपर्यंत चालणाऱ्या या लढतीत प्रत्येक दोन डावांनंतर एक दिवस विश्रांती असणार आहे. ११, १४, १७, २०, २३, २५ नोव्हेंबर हे दिवस विश्रांतीचे असतील. प्रत्येक डावात पहिल्या ४० चालींकरिता १२० मिनिटांचा कालावधी असेल. नंतरच्या २० चालींकरिता ६० मिनिटे व त्यानंतरच्या चालींकरिता १५ मिनिटांचा कालवधी दिला जाईल. १२ डावांमध्ये साडेसहा गुण मिळविणारा खेळाडू विश्वविजेता होईल. नंतर बरोबरी राहिल्यास टायब्रेकर डाव खेळविले जातील. २७ नोव्हेंबर रोजी विश्रांतीचा दिवस असेल तर २८ नोव्हेंबर रोजी टायब्रेकरचे चार डाव खेळविले जातील. या लढतीकरिता पांढऱ्या व काळ्या मोहऱ्यांची निवड ७ नोव्हेंबर रोजी केली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2013 5:47 am

Web Title: chess king viswanathan anand who will be the king of 64 columns
टॅग : Viswanathan Anand
Next Stories
1 आयसीसी पुरस्काराच्या शर्यतीत धोनी, कोहली
2 अनिर्णीत सामन्यात गेलचा गोलंदाजांना धोक्याचा इशारा
3 कुछ मिठा हो जाए..
Just Now!
X