तुषार वैती

भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदकापर्यंत झेप घेत आतापर्यंतचे ऐतिहासिक यश संपादन केले. इंटरनेट पुरवठा आणि सव्‍‌र्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे जागतिक बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्कादी डोर्कोव्हिच यांनी भारत आणि रशिया यांना संयुक्त विजेतेपद बहाल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले, तर काहींनी त्यांच्यावर कडाडून टीकाही केली; पण स्पर्धेच्या नऊ दशकांच्या इतिहासात जेमतेम कांस्यपदकापर्यंत झेप घेणाऱ्या भारताने थेट सुवर्णपदकापर्यंत झेप घेतली, हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. भारतीय बुद्धिबळाची क्षमता अधिक ताकदवान होत असल्याचे हे द्योतक आहे; पण फक्त ऑलिम्पियाडच्या यशावर समाधान न मानता जगज्जेतेपदापर्यंत वाटचाल कशी करता येईल, हे भारताला दाखवून द्यावे लागणार आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही जगातील महत्त्वाची स्पर्धा, पण जगज्जेतेपद आणि कँडिडेट्स (जगज्जेतेपदासाठीचा आव्हानवीर) बुद्धिबळ स्पर्धेइतपत महत्त्व या स्पर्धेला नक्कीच नाही. त्यामुळे जगातील नामांकित बुद्धिबळपटू ऑलिम्पियाडला खचितच महत्त्व देतात. भारताचा पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद मोजक्याच वेळेला या स्पर्धेत खेळला आहे. महिलांमधील अव्वल बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी वैयक्तिक कारणास्तव ऑलिम्पियाडमध्ये खेळत नाही. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे संमिश्र गटात ऑनलाइन पद्धतीने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा खेळवण्यात आली. कनिष्ठ गटाचाही समावेश करण्यात आल्याचा प्रचंड फायदा भारताला झाला. पुरुष आणि महिला बुद्धिबळपटूंना चीनविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. यात आर. प्रज्ञानंद आणि दिव्या देशमुख यांनी चीनची बलाढय़ भिंत सहज भेदली.

एकीकडे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असताना भारतीय बुद्धिबळपटूंनी केलेली कामगिरी ही थक्क करणारी आहे. महासंघाकडून कोणतेही पाठबळ नसताना, वीजपुरवठा, इंटरनेट पुरवठा यांसारख्या असंख्य अडचणी असतानाही खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. १६३ देशांचा सहभाग असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कर्णधार विदित गुजराथी आणि उपकर्णधार श्रीनाथ नारायणन यांनी योग्य पद्धतीने खेळाडूंकडून सराव करवून घेताना संघाची मोट बांधली. त्याचेच फळ भारताला मिळाले.

जगाला बुद्धिबळाचा खेळ देणाऱ्या भारतात अफाट गुणवत्ता आहे, हे फक्त बोलले जायचे; पण पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदचा वारसदार कोण, हा भारतीय बुद्धिबळ चाहत्यांना पडलेला प्रश्नच होता. आनंदने ९०च्या दशकानंतर भारतीय बुद्धिबळाची पताका आंतरराष्ट्रीय क्षितिजावर डौलाने फडकावली; पण त्याची जागा कोण घेणार, याची उत्तरे आता हळूहळू मिळायला सुरुवात झाली आहे. आनंदची कारकीर्द आता अस्ताकडे झुकू लागली आहे, असे तज्ज्ञमंडळींचे मत असले तरी विदित गुजराथी आणि पेंटय़ाला हरिकृष्ण यांच्याकडे आता मोठय़ा आशेने बघितले जात आहे. हरिकृष्णने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे; पण कमी वयात आणि कालावधीत आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या विदितने सर्वाची मने जिंकत आनंदचा वारसदार होण्याचे संकेत दिले आहेत. त्याच्याच कल्पक नेतृत्वामुळे भारताला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णमयी कामगिरी करता आली.

महिलांमध्ये कोनेरू हम्पीकडे अफाट गुणवत्ता आहे. उपांत्य फेरीत पोलंडविरुद्ध भारताने पहिली फेरी २-४ अशी गमावल्यानंतर दुसऱ्या फेरीत ४.५-१.५ असा विजय मिळवत लढत निर्णायक (अर्मेगेडॉन) डावात नेली. जागतिक महासंघाने यासाठी महिलांची लढत निश्चित केल्याने भारताला फायदा झाला. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना हम्पीला ही लढत फक्त बरोबरीत सोडवायची होती; पण जलद प्रकारातील जगज्जेती असलेल्या हम्पीने थेट विजयाला गवसणी घालत भारताला पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचवले. हम्पीपाठोपाठ द्रोणावल्ली हरिका आणि भक्ती कुलकर्णी यांनीही भारतीय संघाच्या विजयात योगदान दिले आहे.

कनिष्ठ गटात आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन आणि दिव्या देशमुख यांच्या तोडीचे बुद्धिबळपटू जगात शोधूनही सापडणार नाहीत. चीन बुद्धिबळपटूंवर अफाट मेहनत घेत असला तरी त्यांना या वयोगटात अद्यापही चांगले खेळाडू घडवता आलेले नाहीत. त्यामुळेच प्रज्ञानंद, निहाल आणि दिव्या यांनी भारताला गरज असताना निर्णायक टप्प्यावर विजय मिळवून दिले आहेत. या तिघांकडेही भारताचे भवितव्य म्हणून पाहिले जात आहे.

भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये मिळवलेले सुवर्णयश कौतुकास्पद आहे. या कामगिरीमुळे भारतही बुद्धिबळातील महासत्ता होऊ शकतो, याचे संकेत जगाला मिळाले आहेत; पण चीन, अमेरिका आणि रशिया यांप्रमाणे बुद्धिबळातील महासत्ता होण्यासाठी भारताला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.

tushar.vaity@expressindia.com