महिलांना आठव्या क्रमांकावर समाधान; चीनची दोन्ही गटांत सुवर्णपदकाला गवसणी

जॉर्जिया येथे सुरू असलेल्या ४३व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघाने निराशाजनक कामगिरी केली. भारतीय पुरुषांना सहाव्या तर महिलांना आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेच्या सुरुवातीला पाचवे मानांकन मिळालेल्या भारतीय पुरुषांनी शुक्रवारी ११व्या फेरीअखेर पोलंडविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. महिलांनी मंगोलियावर ३-१ अशी मात केली. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रत्येकी १६ गुण मिळवले.

अव्वल पटावर चीन आणि अमेरिका यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटली तर रशियाने फ्रान्सवर २.५-१.५ अशी मात करत १८ गुणांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारतीय पुरुषांचे पदक मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. पुरुषांच्या गटात, चीनने अमेरिकेला मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेला रौप्य तर रशियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांमध्येही चीनने सुवर्ण, युक्रेनने रौप्य तर जॉर्जियाने कांस्यपदक मिळवले.

पुरुष गटातील भारताच्या चारही लढती शुक्रवारी बरोबरीत सुटल्या. विश्वनाथन आनंदने डुडा यान-क्रायटोफविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर पी. हरिकृष्णने रॅडोस्लाव्ह वोटासेकविरुद्ध, विदित गुजरातीने पायोरून कॅकपेरविरुद्ध आणि बी. अधिबनने यासेक टोमझॅकविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली.

महिलांमध्ये, द्रोणावल्ली हरिकाने अव्वल पटावर बाखुयाग मुंगुनटूलविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. पण तानिया सचदेवने नॉमिन-एर्डेन डावाडेम्बेरे हिला हरवत भारताची आघाडी वाढवली. ईशा करवडेला तुर्मुख मुनखूझुलविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. मात्र शेवटच्या लढतीत पद्मिनी राऊतने दुलामसुरेन यांजीनदुलाम हिला हरवत भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.