कोल्हापूर : मास्को (रशिया) येथे रशियन बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या ऐरोफ्लोट बुद्धिबळ महोत्सवाच्या ‘ब’ गटामध्ये कोल्हापूरच्या सम्मेद शेटेने नऊ पैकी सहा गुण मिळवून सहावे स्थान पटकावले व महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म प्राप्त केला आहे. त्याचबरोबर सम्मेदने आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्यासाठी आवश्यक २४०० आंतरराष्ट्रीय गुणांकनाचा महत्त्वाचा टप्पाही पार केला असल्याचे गुरुवारी येथे सांगण्यात आले.

एरोफ्लोट-रशियन एअरलाइन्सने आयोजित केलेल्या एरोफ्लोट खुल्या बुद्धिबळ महोत्सवातील ‘ब’ गटांमध्ये सम्मेदला गुणांकानुसार स्पर्धेत ५३वे मानांकन मिळाले होते. एकूण नऊ  फेऱ्यांध्ये स्वीस लीग पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत सम्मेदने तीन आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर, तीन आंतरराष्ट्रीय मास्टर, एक आंतरराष्ट्रीय महिला मास्टर व एक कँडीडेड मास्टर विरुद्ध लढून नऊ पैकी सहा गुण मिळविण्याची नेत्रदीपक उत्कृष्ट कामगिरी केली.

सम्मेदने आठव्या फेरीत मॉलडोव्हचा ग्रँडमास्टर व्लादिमीर हामितेव्हिसीला पराभूत करून आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म निश्चित केला. अंतिम नवव्या फेरीत सम्मेदने मंगोलियाचा आंतरराष्ट्रीय मास्टर सुमिया बिलगूनला बरोबरीत रोखले, परंतु अ‍ॅव्हरेज रेटिंग कमी पडल्यामुळे सम्मेदचा आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टरचा नॉर्म हुकला. सम्मेदचे सध्याचे आंतरराष्ट्रीय गुणांकन २३८७ आहे. या स्पर्धेमध्ये सम्मेदने ३५ गुणांची कमाई केल्यामुळे सम्मेदने महत्त्वाचा आवश्यक २४०० गुणांकनाचा टप्पा पार केला आहे.

क्रीडाप्रेमी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील सम्मेदला भरीव सहकार्य करत आहेत.

सम्मेदला सुरुवातीपासून प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे याम्ंचे प्रशिक्षण लाभले आहे. कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विश्वविजय खानविलकर, माजी अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, भरत चौगुले, आई पद्मजा जयकुमार शेटे, राहुल चिकोडे, सर्जेराव साळोखेंचे  मार्गदर्शन लाभले.

ऐरोफ्लोट बुद्धिबळ महोत्सव : रौनक साधवानीला पहिला ग्रँडमास्टर नॉर्म

नागपूर : नागपूरमधील रौनक साधवानीने मॉस्को येथे सुरू असलेल्या एरोफ्लोट आंतराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेत पहिला ग्रँडमास्टर नॉर्म प्राप्त केला आहे. रौनकने या स्पर्धेत ९ पैकी ४.५ गुण प्राप्त केले. या स्पर्धेनंतर त्याचे गुणांकन २४७५ झाले आहे.  रौनकने ग्रँडमास्टर श्रीनाथ (भारत) विरुद्धच्या डावात विजय मिळवला, तसेच सहा डाव बरोबरीत सोडवले. जिब्राल्टर आणि स्पेनमधील स्पर्धामध्ये त्याला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवता आला नव्हता.