विदित गुजराथी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू

सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासाने खेळण्यावरच भर दिला की कोणत्याही प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळणे जड जात नाही. मी नेहमी याच तंत्राने खेळत आलो आहे. काळ्या किंवा पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना सर्वोत्तम कौशल्य दाखवल्यास सर्वोच्च यश मिळते, असे भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने सांगितले. विदितने नुकत्याच झालेल्या टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील चॅलेंजर विभागात विजेतेपद मिळवले. या विजेतेपदामुळे त्याला पुढील वर्षी मास्टर्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विदितने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखण्याची किमया साधली आहे. आजपर्यंतच्या वाटचालीबाबत व कारकीर्दीविषयी त्याच्याशी केलेली खास बातचीत-

* चॅलेंजर स्पर्धेत विजेतेपदाची खात्री होती काय?   

या स्पर्धेत मला अग्रमानांकन मिळाले होते. या मानांकनाला साजेशी कामगिरी म्हणजेच विजेतेपद मिळवण्याचे माझे ध्येय होते. त्यासाठी माझ्यापुढे युक्रेनच्या अन्तोन कोरोबोव्हचे आव्हान होते. शेवटच्या दोन फेऱ्या बाकी असेपर्यंत आमचे समान गुण होते. शेवटच्या दोन फेऱ्यांपैकी एका डावात त्याने पराभव स्वीकारला व त्यामुळे माझे विजेतेपदाचे स्वप्न साकार झाले. या स्पर्धेतील अन्य खेळाडूही तुल्यबळ प्रतिस्पर्धी होते. या सर्व खेळाडूंच्या शैलीचा मी भरपूर अभ्यास केला होता. हे खेळाडू काळ्या किंवा पांढऱ्या मोहरांनी कसे खेळतात याचा मी बारकाईने अभ्यास केला. माझ्या तंत्रांचे देखील बारकाईने निरीक्षण करणे अपेक्षित होते. त्यामुळेच मी वेगवेगळ्या प्रारंभांचा उपयोग केला. कधी राजापुढील प्याद्याने तर कधी वजिरापुढील प्याद्याने सुरुवात करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस संभ्रमात टाकण्यात मी यशस्वी झालो. या स्पर्धेतील तेरा डावांपैकी पाच डाव मीजिंकले तर आठ डावांमध्ये बरोबरी स्वीकारली.

*  मास्टर्स स्पर्धेसाठी तू पात्र ठरला आहेस. त्या स्पर्धेबाबत काय सांगता येईल?

विश्वविजेता कार्लसन, विश्वनाथन आनंद, फॅबिआनो कारुआना यांच्यासह सर्वच अव्वल खेळाडू या स्पर्धेत खेळत असल्यामुळे भावी कारकीर्दीसाठी ही मला सुवर्णसंधी आहे. विश्वविजेतेदाच्या स्पर्धेत खेळण्यासाठी ही पहिली पायरी आहे असे मी मानतो. जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहा स्थानांवरील खेळाडू या स्पर्धेत असल्यामुळे मला त्यांच्याकडून भरपूर शिकावयास मिळणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप भरपूर अवधी असला तरीही माझी कामगिरी चांगली होण्यासाठी मी कसून सराव करणार आहे.

*  कार्लसनविरुद्ध बरोबरीची खात्री होती का?   

आईल ऑफ मॅन स्पर्धेत कार्लसनविरुद्धचा डाव बरोबरीत सुटेल अशी मी अपेक्षा केली नव्हती. मात्र शेवटपर्यंत त्याला चिवट झुंज देण्याचे माझे ध्येय होते. प्रतिस्पर्धी खेळाडू खूप विचार करीत खेळत असेल किंवा चाली करण्यासाठी वेळ लावत असेल तर हळूहळू कार्लसन आक्रमक चालींची तीव्रता वाढवतो हे मला माहीत होते. त्यामुळेच तो ज्या वेगाने चाली करतो त्याच वेगाने आपणही चाली करायच्या असे मी ठरवले होते. सुदैवाने माझे डावपेच यशस्वी ठरले. त्यातच त्याची व्यूहरचना फारशी चांगली नव्हती. साहजिकच डाव बरोबरीत ठेवण्याखेरीज कोणताही पर्याय नव्हता. डाव झाल्यानंतर कार्लसनने माझे कौतुक केले. हा माझ्यासाठी संस्मरणीय क्षण होता.

 *  विश्वनाथन आनंदशी कसा संवाद होतो?

आनंद हा सहा वेळा विश्वविजेता असला तरीही त्याचे पाय जमिनीवरच आहेत असे मला नेहमी दिसून आले आहे. तो केवळ नावापुरती मला शाबासकी देत नाही तर तो माझ्या डावांचा बारकाईने पाठपुरावा करीत असतो असे मला लक्षात आले आहे. माझ्या खेळात कोणते वेगळेपण आहे किंवा कोणत्या चाली मी करायला पाहिजे होत्या हे तो मला वेळोवेळी सांगत असतो. माझ्यासाठी ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. तो ऑलिम्पियाडमध्ये आमच्या समवेत खेळणार आहे ही आम्हा सर्वाचे मनोबळ वाढविणारी बाजू आहे.

* तुझे आईवडील वैद्यकीय तज्ज्ञ असल्यामुळे तुला त्याच क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचा आग्रह झाला का?               

बुद्धिबळातील माझे कौशल्य पाहून मला पालकांकडून या खेळासाठीच प्रोत्साहन मिळाले आहे. माझे वडील बुद्धिबळ खेळतात. लहानपणी मी त्यांच्याबरोबरच सराव करीत असे. मी जेव्हा बुद्धिबळात कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला, त्या वेळी त्यांनी मला संपूर्ण सहकार्य करण्याची खात्री दिली. माझ्या बुद्धिबळातील करिअरसाठी व विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी मला सोबत करता यावी, म्हणून आईने काही दिवस वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवला होता. मी दररोज साधारणपणे आठ ते दहा तास सराव करीत असताना मला आई-वडिलांची मदत होत असते. त्याचप्रमाणे मी नोकरीत असलेल्या तेल व नैसर्गिक वायू मंडळाकडून मला खूप सहकार्य मिळत आहे.आपल्या देशातील बुद्धिबळाबाबत काय सांगता येईल?    गेल्या काही वर्षांमध्ये या खेळात आपण खूप चांगली प्रगती केली आहे. सुदैवाने प्रसारमाध्यमांनीही आमचा खेळ उचलून धरला आहे. स्पर्धाची संख्या व प्रायोजक वाढत आहेत. खेळाचा अधिकाधिक प्रचार झाला, तर प्रायोजकांची संख्या वाढेल व त्याचा फायदा नवोदित खेळाडूंना मिळेल.