क्रीडा कारकीर्दीपेक्षा शैक्षणिक कारकीर्दीला अधिक महत्त्व दिल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. भारताला बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा परिमार्जन नेगीने बुद्धिबळ तूर्तास बाजूला ठेवत अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रँडमास्टर नेगी हा २१ वर्षीय खेळाडू भारतामधील अव्वल दर्जाचा व उज्ज्वल भवितव्य लाभलेला खेळाडू मानला जातो. त्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित खेळाडू लेव्हॉन आरोनियनला बरोबरीत रोखून सनसनाटी कामगिरी केली होती. तो आता अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जाणार आहे.
या निर्णयाबाबत नेगी म्हणाला, ‘‘जर ऐषारामाचे जीवन जगायचे असेल तर बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविले पाहिजे. आपल्या देशाचा केवळ विश्वनाथन आनंद हाच ती कामगिरी करू शकतो. सध्या अनेक खेळाडू वयाच्या ३५व्या वर्षीच या खेळापासून दूर होऊन स्वत:च्या अर्थार्जनावर लक्ष देत आहेत. जागतिक स्तरावर स्पर्धा एवढी वाढली आहे की मला या खेळाद्वारे आरामशीर जीवन जगण्यासाठी चाळिशीपर्यंत वाट पाहावी
लागेल.’’
‘‘जागतिक क्रमवारीत पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्याची मला खात्री आहे. मात्र या खेळाच्या कारकीर्दीला उच्च शिक्षणाद्वारे मिळविलेल्या भरपूर मोठय़ा पगाराची जोड आवश्यक आहे. त्यामुळेच मी परदेशात शैक्षणिक कारकीर्दीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक पात्रता परीक्षा दिल्या आहेत. स्टॅनफोर्डसारख्या नामांकित विद्यापीठात मला शिक्षणाची संधी मिळाली आहे. ही सुवर्णसंधी मी सोडणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेणे होईल,’’ असेही नेगीने सांगितले. बुद्धिबळापासून पूर्णपणे फारकत घेणार काय असे विचारले असता नेगी म्हणाला, ‘‘अमेरिकेत मी माझा सराव ठेवणार आहे. तेथेही लास व्हेगास चषकासह अनेक चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये मी भाग घेणार आहे. तसेच इंटरनेटद्वारे माझा सराव सुरू राहणार आहे.’’
विश्वचषक लढतीसाठी आनंदच्या सहयोगी चमूमध्ये काम करणे तुला आवडले असते काय, या प्रश्नावर नेगी म्हणाला, ‘‘सहयोगी चमूमध्ये १२ ते १३ तास आपण फक्त वेगवेगळय़ा पद्धतीने सुरुवात करण्याचाच सराव करीत असतो. त्यामुळे या चमूतील खेळाडूला फारसा वैयक्तिक फायदा होत नाही, तसेच आपल्या खेळात फारशी सुधारणा होत नाही.’’