करोना विषाणूमुळे बऱ्याच देशांनी प्रवासबंदीचे नियम अधिक कठोर के ल्यामुळे भारतीय युवा बुद्धिबळपटू लेऑन मेंडोसा सध्या महिनाभरापासून हंगेरीत अडकला आहे. सध्या बुडापेस्टमध्ये असलेल्या १४ वर्षीय मेंडोसाला वडील आणि पुस्तकांचा आधार मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय मास्टर (२४५२ एलो रेटिंग गुण) मेंडोसा मॉस्को येथील एरोफ्लॉट खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुडापेस्टला रवाना झाला होता. ही स्पर्धा १७ मार्चला संपणार होती. पण त्यानंतर युरोपमधून विमानांचे उड्डाण होण्यासाठी निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे तो सध्या बुडापेस्टमध्येच अडकू न आहे.

‘‘आम्ही सुरक्षित असून बुडापेस्टमधील एका इमारतीत राहत आहोत. आता भारतातील टाळेबंदी कधी उठते, याची प्रतीक्षा करत आहोत. टाळेबंदी उठल्यानंतरच आम्हाला भारतात परतता येणार आहे,’’ असे गोव्याच्या मेंडोसाने सांगितले.

‘‘सध्याच्या खडतर काळात हंगेरीमध्ये राहणे जिकिरीचे बनले आहे. मात्र करोनाची भीती असतानाही आम्ही सकारात्मक आहोत.  आम्हाला पैसे हस्तांतरित करण्याची जबाबदारी मित्रमंडळींनी दाखवली आहे,’’ असे त्याचे वडील लिंडन यांनी सांगितले.