जॅक्सनचे शतक; इंडिया ‘ब्ल्यू’चा ६९३ धावांचा डोंगर

भारतीय कसोटी संघातले स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चेतेश्वर पुजाराने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत द्विशतकी खेळी साकारली. या खेळीच्या बळावर इंडिया ब्ल्यू संघाने ६९३ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दुसऱ्या दिवसअखेर इंडिया रेड संघाची २ बाद १६ अशी अवस्था आहे.

दुसऱ्या दिवशी ३ बाद ३६२ धावांवरून पुढे खेळणाऱ्या ब्ल्यू संघाने ३३१ धावांची भर घातली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर चौकार लगावत पुजाराने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील दहाव्या द्विशतकाची नोंद केली. पुजाराने शेल्डॉन जॅक्सनच्या साथीने खेळताना पाचव्या विकेटसाठी २४३ धावांची भागीदारी केली. जॅक्सनने १५ चौकार आणि २ षटकारांसह १३४ धावांची खेळी केली. ४८ धावा करून रवींद्र जडेजा बाद झाला आणि ब्ल्यू संघाने आपला डाव घोषित केला.

प्रचंड धावसंख्येसमोर खेळण्यासाठी उतरलेल्या रेड संघाच्या अभिनव मुकुंद (२) आणि सुदीप चॅटर्जी (०) यांना पंकज सिंगने एकाच षटकात बाद करत ब्ल्यू संघाला मोठे यश मिळवून दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शिखर धवन १४ धावांवर खेळत होता तर युवराज सिंगने अद्याप खाते उघडलेले नव्हते.

संक्षिप्त धावफलक

इंडिया ब्ल्यू : १६८.२ षटकांत ६ बाद ६९३ (चेतेश्वर पुजारा २५६, शेल्डॉन जॅक्सन १३४ अमित मिश्रा २/१७१) वि. इंडिया रेड : ९ षटकांत २ बाद १६ (शिखर धवन १४; पंकज सिंग २/१२)

 

ऑस्ट्रेलिया ‘अ’ विजयी

ब्रिस्बेन : भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यांना ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने तीन गडी राखून हरवत चार दिवसांच्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखले.भारताने त्यांच्यापुढे विजयासाठी दुसऱ्या डावात १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सलामीवीर कॅमेरून बॅन्क्रॉफ्ट याने केलेल्या नाबाद ५८ धावांमुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळविता आला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड मुडी, चाड सेयर्स व डॅनियल वॉरेल यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत भारताचा डाव १५६ धावांमध्ये गुंडाळला.