कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणारा चेतेश्वर पुजारा पुन्हा एकदा दुखापतीच्या फेऱ्यात अडकला आहे. पीसीए मैदानावर भारतीय संघाचा सराव सुरू असताना पुजाराच्या गुडघ्याला दुखापत झाली. हैदराबाद कसोटीत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या पुजाराच्या डाव्या गुडघ्यावर चेंडू आदळला. वेदनांनी अस्वस्थ केल्याने पुजाराला सरावसत्र सोडावे लागले.
संघाच्या डॉक्टरांनी तात्काळ पुजाराच्या गुडघ्यावर उपचार केले. डाव्या गुडघ्याला संरक्षक कवचासह पुजारा पुन्हा सरावासाठी दाखल झाला मात्र त्याने सरावात भग घेतला नाही. गुडघ्याला दुखापत झाल्याने पुजारा थोडेसे अडखळत चालत होता. चालतानाही त्रास होत असल्याने त्याला बसून सराव बघणे भाग पडले. सराव सत्र संपल्यानंतर पुजारा चालत पॅव्हेलियनमध्ये परतला. गुरुवारपासून तिसरी कसोटी सुरू होत आहे. पुजाराच्या दुखापतीने भारतीय संघव्यवस्थापनाच्या चिंता वाढल्या आहेत. पुजारा खेळू न शकल्यास शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. पुजाराच्या गुडघ्यावर याआधी शस्त्रक्रिया झाली आहे. या आजारामुळे प्रदीर्घ काळ त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते.