भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’ म्हणून ओळख असलेल्या राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजारानं भारतीय संघात स्थान मिळवलं. राहुल द्रविडप्रमाणेच पुजारानं कसोटीत संयमी वेगवान माऱ्याचा सामना करत दुसरी वॉल असल्याचं सिद्ध केलं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुजाराला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर चषकातही पुजारा अपयशी ठरत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावांत पुजारा फक्त १७ धावा काढून बाद झाला. अॅडिलेड येथे झालेल्या कसोटीत पहिल्या डावात ४३ तर दुसऱ्या डावात ० धावावर पुजारा बाद झाला होता. २०१८ पासून पुजाराच्या बॅटमधून एकही शतक आलेलं नाही. पुजाराच्या अपयशामुळे भारतीय संघाचा मध्यक्रमही कमकुवत दिसून येत आहे.

सध्या पुजारा मैदानावर वेळ घालवतोय मात्र त्याला धावा काढता येत नाहीत. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पुजारानं ७० चेंडूचा सामना करताना फक्त १७ धावा काढल्या. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावांत ४३ धावा काढण्यासाठी १६० चेंडूचा सामना केला. दुसऱ्या डावात ८ चेंडूंचा सामना केला मात्र एकही धाव काढता आली नाही.

३२ वर्षीय चेतेश्वर पुजाराला गेल्या १७ डावांत एकही शतक झळकावता आलं नाही. दोन वर्षापूर्वी २०१८ मध्ये चेतेश्वर पुजारानं ऑस्ट्रेलियाविरोधातच अखेरच शतक झळकावलं होतं. सिडनी येथे झालेल्या सामन्यात पुजारानं १९३ धावांची खेळी केली होती. पुजाराचं हे अखेरचं शतक होतं. त्यानंतर पुजाराला अद्याप एकही शतक झळकावता आलेलं नाही. पुजाराचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जानेवरी २०२० मध्ये न्यूझीलंडविरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यातील चार डावांत पुजाराला फक्त १०० धावा करता आल्या होत्या. ही मालिका भारतानं २-० नं गमावली होती.

पुजाराची कसोटीतील कामगिरी –

चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १८ शतकं आणि २५ अर्धशतकं झळाकवली आहेत. ७८ कसोटी सामन्यात ४८.२२ च्या दमदार सरासरीनं ५९३३ धावा केल्या आहेत. आपल्या कसोटी कारकिर्दीत पुजारानं तीन द्विशतकी खेळ्या केल्या आहेत.

पुजाराची तोड आहे का?

पुजाराच्या खराब फॉर्ममुळे भारतीय संघाचा मध्यक्रमही अपयशी ठरत आहे. पुजाराचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाकडे के. एल. राहुलससारखा पर्याय उपलब्ध आहे. जो सध्याच्या परिस्थितीमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाकडून राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. याशिवाय विकेटकिपरची जबाबदारी पार पाडू शकतो. त्यामुळे संघात अतिरिक्त गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देता येऊ शकते.