भारतीय संघात पुनरागमनासाठी आतुर वेगवान गोलंदाज झहीर खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने तिसऱ्या अनधिकृत कसोटीत वेस्ट इंडिज ‘अ’ संघावर एक डाव आणि ५४ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिज ‘अ’ संघाने पहिल्या डावात २६८ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाने चेतेश्वर पुजाराच्या मॅरेथॉन त्रिशतकी खेळीच्या आधारे ९ बाद ५६४ धावांवर आपला डाव घोषित केला. २९६ धावांनी पिछाडीवर पडलेल्या वेस्ट इंडिज संघाने ३ बाद ११६ वरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र झहीर खानच्या गोलंदाजीसमोर त्यांची घसरगुंडी उडाली. वेस्ट इंडिज संघाचा डाव २४२ धावांतच आटोपला. नरसिंग देवनरिनचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने १३ चौकारांसह ९९ धावांची खेळी करत वेस्ट इंडिजचा पराभव लांबवला. झहीरने ५९ धावांत ४ बळी टिपले. या विजयासह भारतीय संघाने तीन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.