जयदेव उनाडकच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्र संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत गुजरातवर ९२ धावांनी मात करत सौराष्ट्राने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. अंतिम फेरीत सौराष्ट्राची गाठ बंगालशी पडणार आहे. शेल्डन जॅक्सनच्या शतकी खेळाच्या जोरावर सौराष्ट्राने पहिल्या डावात ३०४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल गुजरातचा संघ पहिल्या डावात २५२ धावांपर्यंतच मजल मारु शकला. गुजरातकडून रुजुल भट आणि अखेरच्या फळीत चिंतन गजाने अर्धशतकी खेळी करत चांगली झुंज दिली. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ७ बळी घेतले.

या विजयानंतर सौराष्ट्राचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने आपल्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत, मी अंतिम फेरीसाठी येतोय असा संदेश पुजाराने दिला आहे.

नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पुजारा भारतीय संघाकडून खेळला. मात्र या दोन्ही सामन्यांत त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये पुजाराची कामगिरी ही नेहमीच वाखणण्याजोगी राहिलेली आहे. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – सौराष्ट्र रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत, कर्णधार जयदेव उनाडकटचा विक्रम