कसोटी क्रिकेट खेळणारा फलंदाज असा शिक्का बसलेल्या चेतेश्वर पुजाराने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सौराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताना पुजाराने नाबाद शतकी खेळी केली. पुजाराने 61 चेंडूत 14 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद शंभर धावा पटकावल्या. पुजाराच्या या शतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्राने रेल्वेविरुद्ध खेळताना आपल्या संघाला 188 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

गेली अनेक वर्ष चेतेश्वर पुजाराला भारताच्या वन-डे आणि टी-20 संघात जागा मिळत नाही. याचसोबत आयपीएलमध्येही कोणताही संघमालक पुजारावर बोली लावत नाही. मात्र आज टी-20 क्रिकेटमध्ये शतकी खेळी करत पुजाराने, आपल्याला संथ खेळीवरुन टीका करणाऱ्या प्रत्येकाला चपराक लगावली आहे. पुजाराला आतापर्यंत आयपीएलमध्ये 30 सामन्यांत 20.52 च्या सरासरीनं 390 धावा करता आल्या आहेत. त्यात 51 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. पण, 2014 नंतर त्याला आयपीएलपासून दूर ठेवण्याचाच पवित्रा संघ मालकांनी घेतला.

यानंतर पुजाराने सर्व लक्ष्य कसोटीकडे केंद्रीत करताना भारतीय संघासाठी बहुमुल्य योगदान दिले. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही पुजाराची बॅट चांगलीच तळपली होती. इंग्लंड दौऱ्यातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती, परंतु रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो अपयशी ठरला आणि विदर्भने जेतेपदाला गवसणी घातली.