चेतेश्वर पुजाराने शानदार द्विशतक झळकावत हैदराबाद कसोटीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र दोनशेचा टप्पा ओलांडल्यानंतर हुकचा फटका खेळताना पुजाराने आपली विकेट गमावली. चेतेश्वरच्या या हुकच्या फटक्याने त्याचे वडील नाराज झाले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ही नक्कीच विशेष कामगिरी आहे. मात्र आपण चेतेश्वरला हुकचा फटका खेळू नकोस असे सांगितल्याचे त्याचे वडील आणि प्रशिक्षक अरविंद पुजारा यांनी स्पष्ट केले.
हा फटका खेळून धावा मिळतात असे चेतेश्वर सांगेल. मात्र हा फटका आत्मघातकी ठरू शकतो. हा फटका खेळतानाच तो बाद झाला, त्यामुळे त्याने हा फटका खेळू नये असे अरविंद पुढे सांगतात.
‘व्ही’ अर्थात एक्स्ट्रा कव्हर तसेच मिडविकेटच्या टप्प्यात तो खरंच सुरेख खेळतो. त्यामुळे अनैसर्गिक फटके खेळण्याची आवश्यकताच नाही. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह-ऑन ड्राइव्हच्या फटक्यांद्वारे तो खोऱ्याने धावा काढू शकतो. त्याने त्याच क्षेत्रात धावा काढणे सुरू ठेवावे असे अरविंद सांगतात.
मोठय़ा शतकांची आस हे चेतेश्वरचे वैशिष्टय़ आहे. शतक झळकावून तो नाबाद असेल तर पुढच्या दिवशी या शतकाचे द्विशतकात रूपांतर करण्यास तो आतुर असतो. यामुळेच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर अनेक त्रिशतके तसेच द्विशतकाची नोंद आहे. यापुढेही तो कामगिरीत असेच सातत्य राखेल अशी आशा असल्याचे अरविंद यांनी सांगितले.
आईच्या निधनानंतर चेतेश्वरला मानसिक आधाराची गरज होती. लग्नामुळे त्याला हा आधार मिळाल्याने समाधानी वाटत असल्याचे अरविंद यांनी सांगितले.