जामसंडे, देवगड येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पध्रेत मुंबई शहर आणि पुणे या संघांनी पुरुष व महिला दोन्ही विभागांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला़  
या स्पध्रेत महिलांचे दोन्ही उपउपांत्य सामने एकतर्फी झाल़े  मुंबई शहरने ठाण्याचे आव्हान २९-१० असे संपुष्टात आणल़े  मध्यंतराला २२-४ अशी आघाडी घेणाऱ्या मुंबईने नंतर मात्र संथ खेळ करून १९ गुणांनी सामना जिंकला़  अपेक्षा टाकळे, सोनाली शिंगटे यांच्या चढाया, तर गौरी वाडेकर, सुवर्णा बारटक्के यांच्या पकडीचा खेळ या विजयात बहरला़  ठाण्याच्या अद्वैता मांगले, श्वेता राणे यांना साजेसा खेळ करण्यात अपयश आल़े  दुसऱ्या सामन्यात पुण्याने सांगलीला ४९-११ असे नमवल़े  नेहा घाडगे, ईश्वरी कोंढाळकर यांनी अनुक्रमे चढाया व पकडी केल्या.   
पुरुष गटात मुंबई शहरने मध्यंतरातील २-४ अशा पिछाडीवरून कोल्हापूरचे कडवे आव्हान ८-५ असे मोडून काढल़े  सागर कुऱ्हाडे, श्री भारती यांनी मध्यंतरानंतर आपला खेळ उंचावत मुंबईला ५-५ अशी बरोबरी गाठून दिली़  त्यानंतर मुंबईने जबरदस्त मुसंडी मारली़  त्यांच्या बाजीराव होडगेने मोक्याच्या क्षणी उत्कृष्ट पकडी करीत ३ गुणांनी हा विजय मिळवून दिला़  महेश मगदुमची झालेली पकड कोल्हापूरला महागात पडली़  पुण्याने ठाण्याला २१-८ असे सहज पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली़  नीलेश काळभेरे, अक्षय जाधव यांच्या चढाया व विराज लांडगेच्या पकडीमुळे पुण्याने विजय मिळवला़