शिवछत्रपती क्रीडानगरीतील विविध सुविधांचा उपयोग होण्यासाठी आणि त्यांची योग्य देखभाल होण्यासाठी येथे कायमस्वरूपी क्रीडा व युवक विकास केंद्र होणार आहे, असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी दिलेले. प्रा. संजय दुधाणे यांनी लिहिलेल्या ‘फ्लाइंग शीख मिल्खा सिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी वळवी यांच्या हस्ते झाले.
या वेळी वळवी म्हणाले की, ‘‘शिवछत्रपती क्रीडा संकुलात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा विकास केंद्र तसेच क्रीडावैद्यक शास्त्र केंद्र सुरू करण्याचाही केंद्र शासनाचा विचार आहे. त्याची पाहणी करण्यासाठी येथे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही आले आहेत. या संकुलातच क्रीडा संग्रहालय सुरू केले जाणार आहे. त्यामध्ये खेळाविषयी विविध पुस्तके, सीडीज, बोधचिन्हांची विक्री व्यवस्था केली जाणार आहे. शासनाने राज्याचे क्रीडा धोरण यापूर्वीच जाहीर केले असून त्याच्या अंमलबजावणीस लवकरच प्रारंभ होईल.’’
या वेळी ऑलिम्पिकपटू बाळकृष्ण अकोटकर, आशियाई पदकविजेते रमेश तावडे,  राज्याचे सहक्रीडा संचालक नरेंद्र सोपल, उपक्रीडा संचालक माणिक ठोसरे हेही यावेळी उपस्थित होते.