एकदिवसीय मालिकेप्रमाणेच ट्वेन्टी-२० सामन्यांमध्येही अजिंक्यपद राखून झिम्बाब्वेची शुभ्रधुलाई करण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंग पावले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने भारतावर १० धावांनी मात करत या दौऱ्यात पहिला विजय मिळवत शेवट गोड केला. या विजयासह झिम्बाब्वेने दोन सामन्यांची ट्वेन्टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. चामू चिभाभाच्या अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेला पहिल्यांदा फलंदाजी करताना १४५ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला १३५ धावा करता आल्या. ़अर्धशतकवीर चिभाभाला या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. १९ धावांवर त्यांना पहिला धक्का बसला आणि त्यानंतर ठरावीक फरकाने त्यांचे फलंदाज बाद होत तंबूत परतत होते, याला अपवाद ठरला तो सलामीवीर चामू चिभाभा. भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत चिभाभाने ५१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी साकारली. या डावात झिम्बाब्वेच्या फक्त तीन फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या उभारता आली. मोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
झिम्बाब्वेच्या आव्हानाचा पाढलाग करताना भारताने अवघ्या चार धावांवर कर्णधार अजिंक्य रहाणेला (४) गमावले. पण त्यानंतर रॉबिन उथप्पाने २५ चेंडूंत ९ चौकारांसह ४२ धावांची धडाकेबाज खेळी साकारल्यामुळे भारत हा सामना जिंकत अजिंक्य राहणार असे वाटत होते. पण सीन विल्यम्सने स्वत:च्याच गोलंदाजीवर उथप्पाला बाद केले आणि भारतीय संघाची पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. स्टुअर्ट बिन्नी (२४), संजू सॅमसन (१९) आणि अक्षर पटेल (१३) यांनी भारताला जिंकवण्याचे प्रयत्न केले खरे, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. झिम्बाब्वेकडून ग्रॅमी क्रीमरने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे : २० षटकांत ७ बाद १४५ (चामू चिभाभा ६७; भुवनेश्वर कुमार २/२६, मोहित शर्मा २/२८) विजयी वि. भारत : २० षटकांत ९ बाद १३५ (रॉबिन उथप्पा ४२ ; ग्रॅमी क्रीमर ३/१८). सामनावीर : चामू चिभाभा.