भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत महत्वाच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले. या गोष्टीची सर्वत्र चर्चा झाली. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका करण्यात आली. मात्र या संदर्भात मिताली राज हिने आज पत्रातून एक गौप्यस्फोट केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्व खेळवण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मला प्रशिक्षक रमेश यांनी नजरकैदेत ठेवले होते, असा आरोप तिने केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा विजय झाला. भारत जिंकल्यानंतर रमेश पोवार यांनी एका खेळाडूकरवी मला मैदानात येण्यास सांगितले आणि इतर खेळाडूंबरोबर विजय साजरा करण्याचा सल्ला दिला. हा निरोप ऐकून मी भांबावून गेले. कारण संपूर्ण सामन्यात प्रसारमाध्यमांशी मी चर्चा करू नये आणि ड्रेसिंग रूममधून बाहेर पडू नये म्हणून मला नजरकैदेत ठेवण्यात आले होते, असे तिने पत्रात लिहिले आहे.
मी रमेश पोवार यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र ते मला टाळण्याचा कायमच प्रयत्न करायचे. मी त्यांच्या खिजगणतीतीही नव्हते. मी आसपास असले की ते जाणूनबुजून दुसऱ्या दिशेला पाहायचे आणि माझ्याकडे पाठ फिरवायचे, असेही तिने पत्रात नमूद केले आहे. तसेच ‘काही लोकं मला संपवायला टपले आहेत’, असे सांगत मिताली हिने संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यासह प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडलजी यांच्यावरही पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 6:19 pm