भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने सध्या भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. मात्र सध्या ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नुकतेच क्रिकेटचे मैदान गाजवले. नागपूरमध्ये रविवारी क्रिकेटचा एक मैत्रिपूर्ण सामना खेळण्यात आला. ‘ऑल जजेस इलेव्हन’ विरूद्ध ‘हाय कोर्ट बार असोसिएशन इलेव्हन’ या संघात नागपूरात हा सामना खेळण्यात आला.

‘ऑल जजेस इलेव्हन’ विरूद्ध ‘हाय कोर्ट बार असोसिएशन इलेव्हन’ यांच्यातील सामना १५ षटकांचा होता. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना रंगला होता. देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे जुने क्रीडापटू आहेत. नागपुरात घरी आले असता, त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. महत्त्वाची बाब म्हणजे ते या सामन्यात टॉप स्कोरर ठरले. त्यांनी फलंदाजी करताना ३१ चेंडून १८ धावा केल्या. यात तीन चौकारांचा समावेश होता.

दरम्यान,  ‘ऑल जजेस इलेव्हन’ विरूद्ध ‘हाय कोर्ट बार असोसिएशन इलेव्हन’ या संघाच्या सामन्यात बोबडे यांचा प्रतिस्पर्धी संघ ‘हाय कोर्ट बार असोसिएशन इलेव्हन’ विजेता ठरला.