तब्बल ९९ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणत चिलीने पहिल्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. पेनल्टी शूटआऊटच्या आधारे अर्जेटिनावर ४-१ असा विजय मिळवत चिलीने इतिहास घडवला. लिओनेल मेस्सीला सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

निर्धारित वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीच्या अलेक्सी सँचेझने अर्जेटिनाच्या सर्जिओ रोमेरोवर चकवत गोल केला आणि ४५,००० चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यजमानांनीच जेतेपदावर कब्जा केल्याने राजधानी सँटियागोत रात्रभर उत्साहाला उधाण आले होते.
२२ वर्षांनंतर अर्जेटिनाला जेतेपद मिळवून देण्यासाठी कर्णधार मेस्सी आतुर होता. मात्र बार्सिलोनासाठी सातत्याने विविध स्पर्धाची जेतेपदे मिळवून देणाऱ्या मेस्सीला अर्जेटिनासाठी खेळताना ते सातत्य राखता आले नाही. गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही अर्जेटिनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मेस्सीला अंतिम लढतीत मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कोपा अमेरिका स्पर्धेत चिलीने अर्जेटिनावर मिळवलेला हा पहिलाच विजय आहे.
निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. चिलीतर्फे व्हिदालने चेंडू सँचेझकडे सोपवला, मात्र अर्जेटिनाचा गोलरक्षक रोमेरोने हा प्रयत्न थोपवला. अर्जेटिनातर्फे अँजेल डि मारिया आणि लिओनेल मेस्सी यांनी सातत्याने चेंडूवर ताबा मिळवला, मात्र गोल करण्यात त्यांना अपयशच आले. सर्जिओ ऑग्युरोने मेस्सीच्या फ्री-किकवर गोल करण्याचा प्रयत्न विफळ ठरला. मध्यंतराला काही मिनिटे असताना जेव्हियर पास्तोरने लाव्हेझीकडे चेंडू सोपवला मात्र ब्राव्होने हा प्रयत्न रोखला. ८२व्या मिनिटाला सँचेझचा गोल करण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. शेवटच्या मिनिटांमध्ये मेस्सीने चेंडूवर ताबा मिळवत लाव्हेझीकडे सोपवला. लाव्हेझीने तो हिग्युेनकडे सोपवला. मात्र त्याला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पेनल्टी शूटआऊटमध्ये सँचेझच्या निर्णायक गोलच्या जोरावर चिलीने बाजी मारली.

शूट आऊटचा निकाल
चिली मटिअस फर्नाडिझ (गोल)
अरटय़ुरो व्हिदाल (गोल) चार्ल्स अरनग्युझ (गोल) अलेक्सी सँचेझ (गोल)
* चिलीने कोपा अमेरिका स्पर्धेचे १७३ सामने खेळल्यानंतर त्यांच्या नशिबी जेतेपद.
* चिलीला १९५५, १९५६, १९७९ आणि १९८७ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
अर्जेटिना
लिओनेल मेस्सी (गोल)
गोन्झालो हिग्युेन
इव्हर बनेगा
(गोल संधी नाही)
स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळेच हा विजय साकारला आहे. चिलीच्या नागरिकांचा आनंद देणारा हा विजय आहे. पुढच्या विश्वचषकातही अशाच प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्याचा मानस आहे.
– अरटय़ुरो व्हिदाल