चिली (ब-गट)

फिफा क्रमवारीतील स्थान : १४
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : ९ वेळा (२०१४सह)
* तिसरे स्थान : १९६२
दक्षिण अमेरिकेतील सर्वात जुन्या संघांपैकी एक.. अभिमानास्पद इतिहास.. आक्रमक खेळ आणि तांत्रिक आविष्काराचा मिलाफ असलेला संघ म्हणजे चिली. पण स्पेन आणि नेदरलँड्सच्या गटात चिली सामील झाल्यामुळे या गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’चे स्वरूप आले आहे. आक्रमक खेळ, प्रतिस्पध्र्यावर दबाव आणण्याची क्षमता, अखेरच्या क्षणी खेळ उंचावण्यात पटाईत, भन्नाट व्यूहरचना, युरोपमध्ये प्रशिक्षण आणि अफाट अनुभव गाठीशी असल्यामुळे चिली संघ गटात तिखट मिरची ठरण्याची शक्यताच अधिक आहे. २०१०च्या विश्वचषकाची अंतिम फेरीत गाठणाऱ्या स्पेन आणि नेदरलँड्ससाठी चिली हा संघ डोकेदुखी ठरणार, हे निश्चित.
अर्जेटिनाच्या जॉर्ज सॅम्पाओली यांनी डिसेंबर २०१२मध्ये प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चिली संघाला नवी झळाळी मिळाली आहे. त्यांच्या ३-४-३ या व्यूहरचनेमुळे प्रतिस्पर्धी संघाच्या मधल्या फळीवर दडपण आल्यामुळे अनेक आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले आहेत. चिलीची मधली फळी जगातील सर्वोत्तम खेळाडूंनी समृद्ध आहे. अ‍ॅलेक्सिस सांचेझ आणि एड्वाडरे वर्गास या आक्रमकवीरांच्या जोडीला आर्टुरो विदाल आणि हम्बटरे सुआझो हे सर्वोत्तम मधल्या फळीतील खेळाडू आहेत. ला लिगा स्पर्धेत छाप पाडल्यानंतर आता हम्बटरेकडून सर्वाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गोलरक्षक क्लॉडियो ब्राव्हो याने या मोसमात अप्रतिम कामगिरी साकारली आहे. नुकताच दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर क्लॉडियो आता कशी कामगिरी करतो, यावरच चिलीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. युरोपियन फुटबॉलमधील मधल्या फळीतील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून आर्टुरो विदालचे नाव घेतले जाते. प्रतिस्पध्र्याचे हल्ले रोखणे तसेच गोल करण्याच्या संधी निर्माण करणे, या भूमिका तो चोखपणे पार पाडत असतो. अ‍ॅलेक्सीस सांचेझने बार्सिलोनातर्फे खेळताना या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. या वेळी चिली हा संघ ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळखला जात असल्यामुळे सर्वाच्या नजरा त्यांच्या कामगिरीकडे खिळल्या आहेत.

संभाव्य संघ
गोलरक्षक : क्लॉडियो ब्राव्हो, मिग्युएल पिंटो. बचाव फळी : मॉरिसियो इस्ला, गॅरी मेडेल, मार्कस गोंझालेझ, इयुजेनियो मेना, जोस रोजास, गोंझालो फिएरो. मधली फळी : आर्टुरो विदाल, डेव्हिड पिझ्झारियो, जॉर्ज वाल्डिविया, गोंझालो जारा, मटियास फर्नाडेस, जीन बैसेजोर, कार्लोस कार्मोना, जोस प्रेडो फ्युएनझालिडा, मार्सेलो डियाझ, चार्लस अरानगुइझ, फेलिपे गुटिएरेझ, फ्रान्सेस्को सिल्वा. आघाडीवीर : अ‍ॅलेक्सिस सांचेझ, हम्बटरे सुआझो, एड्वाडरे वर्गास.

ल्ल स्टार खेळाडू : आर्टुरो विदाल, अ‍ॅलेक्सिस सांचेझ, हम्बटरे सुआझो, क्लॉडियो ब्राव्हो.
.
ल्ल व्यूहरचना : ३-४-३ किंवा ३-१-४-२

ल्ल प्रशिक्षक :
जॉर्ज सॅम्पाओली.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
खेळाची अप्रतिम शैली, मैदानावरील सरस कामगिरी, प्रतिस्पध्र्यावर दबाव आणण्यात वाकबगार आणि इतरांपेक्षा खेळाची वेगळी पद्धत यामुळे चिली संघ इतरांच्या बाबतीत उजवा ठरतो. समतोल आणि प्रभावी संघ, यामुळे गटात स्पेन किंवा नेदरलँड्सवर भारी पडण्याची शक्यता आहे. अखेरच्या मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडू थकले असल्याचा फायदा उठवण्यात चिली संघ पटाईत आहे. अखेरच्या मिनिटांसाठी ऊर्जा राखून ठेवण्याचे तंत्र त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र एकदा पराभूत होऊ लागले की पुनरागमन करणे चिली संघासाठी कठीण जाते. चिलीचा दुबळा बचाव ही संघासाठी मोठी समस्या आहे. फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणाऱ्या अन्य संघांच्या तुलनेत चिली संघाने पात्रता फेरीत सर्वात जास्त गोल पत्करले आहेत. त्यामुळे बचावाच्या बाबतीत चिली संघाला सुधारणा घडवून आणावी लागणार आहे.

अपेक्षित कामगिरी
स्पेन, नेदरलँड्स आणि चिली हे तीन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील, असा गट म्हणजे ब गट. मात्र दोनच संघ गटातून बाद फेरीसाठी पात्र ठरू शकतात, हे दुर्दैव. स्पेन या गटात अव्वल स्थान पटकावणार, यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे दुसऱ्या स्थानासाठी चिली आणि नेदरलँड्स यांच्यात काँटे की टक्कर रंगणार आहे. नेदरलँड्सची सध्याची कामगिरी पाहता, चिली या गटातून अव्वल १६ जणांमध्ये स्थान पटकावणार, असा अंदाज फुटबॉल पंडितांनी वर्तवला आहे. ऑस्ट्रेलियावर मात करून चिलीच्या खात्यात तीन गुणांची भर पडेल. चिली संघाने जरी बाद फेरीत मजल मारली तरी त्यांची घोडदौड उपांत्यपूर्वआधीच संपुष्टात येणार आहे.

आर्टुरो विदाल