शंभर लढतींत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करूनही कर्णधार लिओनेल मेस्सीला एकही जेतेपद पटकावून देता आलेले नाही. त्यामुळे मेस्सीला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेचे विजेतेपद साद घालत आहे. १९९३ नंतर या स्पध्रेच्या जेतेपदापासून दूर असलेल्या अर्जेटिनाला जवळपास २३ वर्षांनंतर इतिहास घडवण्याची संधी आहे. जेतेपदाच्या शर्यतीत त्यांच्यासमोर यजमान चिलीचे आव्हान असणार आहे. दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा अर्जेटिनाचा संघ १५व्या कोपा अमेरिकेच्या जेतेपदासाठी सज्ज आहे, तर दुसरीकडे चिलीनेही पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल हे नक्की.
अर्जेटिनाला या जेतेपदाची प्रतीक्षा आहे, त्याहून अधिक मेस्सीला हा विजय हवा आहे, कारण बार्सिलोनाच्या या दिग्गज खेळाडूला राष्ट्रीय संघात खेळताना अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठी त्याला कोपा अमेरिकेचे जेतेपद पटकवावेच लागणार आहे. इस्टाडिओ नॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत अर्जेटिनाला चिलीचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. चिलीची स्पध्रेतील आत्तापर्यंतची कामगिरी पाहता त्यांनी धक्कादायक निकालांची नोंद केली आहे आणि अंतिम लढतीतही त्यांच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा आहे. १९५५, १९५६, १९७९ आणि १९८७ सालात चिलीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते आणि त्यांना आता जेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे अर्जेटिनाला कडवे आव्हान देण्यासाठी ते सज्ज आहेत.

’सामन्याची वेळ : मध्यरात्री १.३० वाजता
’थेट प्रक्षेपण : सोनी किक्स व सोनी सिक्स एचडी

संघांची कामगिरी

’चिली २-० एक्वेडोर
’चिली ३-३ मेक्सिको
’चिली ५-० बोलिव्हिआ
’चिली १-० उरुग्वे (उपांत्यपूर्व)
’चिली २-१ पेरू (उपांत्य)

’अर्जेटिना २-२ पॅराग्वे
’अर्जेटिना १-० उरुग्वे
’अर्जेटिना १-० जमैका
’अर्जेटिना ५-४ कोलंबिया (पेनल्टी शूटआऊट) (उपांत्यपूर्व)
’अर्जेटिना ६-१ पॅराग्वे (उपांत्य)