चीनचा भारतावर २-१असा निसटता विजय

अव्वल दर्जाची खेळाडू अंकिता रैना हिने एकेरीचा सामना जिंकूनही भारतास फेडरेशन टेनिस स्पर्धेत चीनविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारावा लागला. वेगवान खेळाचा प्रत्यय घडवीत अंकिता हिने लिन झुओ हिच्यावर ६-३, ६-२ असा सनसनाटी विजय मिळविला. मात्र तिची सहकारी करमान कौर हिला वाँग यफान हिने ६-२, ६-२ असे पराभूत करीत १-१ अशी बरोबरी साधली. दुहेरीच्या निर्णायक लढतीत अंकिता व प्रार्थना ठोंबरे यांना वाँग व झाओझुआन यांग यांनी ६-२, ७-६ (७-१) असे हरविले आणि चीनला विजय मिळवून दिला. भारतीय खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेता आला नाही. दुहेरीतील लढतीत अंकिता व प्रार्थना यांच्यात अपेक्षेइतकी सुसंगतता नव्हती, तसेच त्यांच्याकडून अनावश्यक चुकाही झाल्या.

एकेरीच्या लढतीत अंकिता हिने फोरहँड व बॅकहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच तिने दाखविलेले चापल्य कौतुकास्पद होते. या सामन्यातील ताकदवान खेळाची तिला दुहेरीत पुनरावृत्ती करता आली नाही. तेथे तिची दमछाकही झाली.

चीनच्या खेळाडूंचे मंगळवारी येथे आगमन झाले, त्यामुळे त्यांना अपेक्षेइतका सरावही करता आला नव्हता. तरीही त्यांच्या खेळाडूंनी दाखविलेली चिकाटी कौतुकास्पद होती. वांग हिने नुकत्याच झालेल्या तैपेई खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. भारतास साखळी गटातील पुढच्या सामन्यात कझाकिस्तान संघाशी खेळावे लागणार आहे. कझाकिस्तान संघाने हाँगकाँग संघाचा ३-० असा दणदणीत पराभव केला.